यावल प्रतिनिधी । जनतेचे काम वेळेवर न करणाऱ्या यावल तहसीलदार यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय आघाडीचे शहराध्यक्ष कामराज घारू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरातील तहसीलदार हे जनतेचे वेळेवर काम करत नाही आणि काही पक्षाचे नेते व कार्यकर्ते एक एक दोन दोन तास केबिनमध्ये बसून राहतात. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते दरवाजाच्या बाहेर तहसीलदार यांची दोन तास वाट बघत असतात. तसेच तालुक्यातील व शहरातील जनतेला आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना कामाचे आश्वासन देतात परंतू प्रत्यक्ष मात्र काम होत नाही. यावल तालुक्यातील पेट्रोल पंप मालकाकडे लायसन्स नसतांना पेट्रोल पंप सुरू आहे. ती तात्काळ बंद करण्यात आलेले नाही. याबाबत उडवाउडवीची उत्तरे देतात त्यामुळे शासनाला मोठा महसूल बुडत आहे. या कारवाईकडे तहसीलदार काही दखल घेत नाही. ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांचे नुकसान होत आहे. तहसीलदारांच्या आशीर्वादामुळे अवैध वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. तसेच शासनाचे श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना यांच्यासह पुरवठा शाखेकडून वेळी लागणारे रेशन कार्ड तीन-तीन, चार-चार महिने तहसीलदार फिरवतात. लाभार्थ्यांचे वेळेवर काम न करता लाभ देत नाही, शासनाने वाळू वाहतुकीचे काम बंद ठेवले परंतु तहसीलदार यांच्या आशीर्वादामुळे 24 तास वाळूची वाहतूक सुरू आहे, अशा तहसीलदारांची येत्या वीस दिवसात बदली न झाल्यास राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह तालुक्यातील जनता तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.