यावल ः प्रतिनिधी
येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी देवयानी महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या सभागृहात पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार यांनी निवडीसाठी ऑनलाइन विशेष सभा घेतली. विहित मुदतीत एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने महाजन यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.
तत्कालीन उपनगराध्यक्षा पौर्णिमा फालक यांनी काही दिवासांपुर्वी राजीनामा दिला होता. रिक्त असलेल्या जागेवर सोमवारी नूतन उपनगराध्यक्षांची निवड करण्यात आली. नगरपालिकेच्या सभागृहात सकाळी उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात आले. या मुदतीत सत्ताधारी गटातील देवयानी गिरीश महाजन यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सूचक गटनेता अतुल पाटील होते तर अनुमोदक अभिमन्यु चौधरी होते. पीठासीन अधिकारी तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन विशेष सभा घेऊन निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यात उपनगराध्यक्ष पदासाठी महाजन यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदारांनी जाहीर केले. सभागृहात तहसीलदार महेश पवार, मुख्याधिकारी बबन तडवी, नगराध्यक्षा नौशाद तडवी यांची उपस्थिती होती. पालिकेत विजय बढे, राजेंद्र गायकवाड, शिवानंद कानडे यांनी सहकार्य केले.
सत्ताधारी गटनेता अतुल पाटील, गटनेता राकेश कोलते, मावळत्या उपनगराध्यक्ष पौर्णिमा फालक, नगरसेवक प्रा. मुकेश येवले, अभिमन्यू चौधरी, समीर मोमीन, शेख असलम, रूख्माबाई भालेराव-महाजन, रेखा चौधरी, शिला सोनवणे, गणेश महाजन, गोलू माळी, पवन खर्चे, एजाज देशमुख आदींनी निवडीचे स्वागत केले.