मुंबई : प्रतिनिधी
आमदार अपात्रतेप्रकरणी विधीमंंडळात सुनावणी झाली. आज दोन्ही गटाने युक्तिवाद केला. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुरावे सादर करण्यावरुन दोन गटांमध्ये मतभेद होते. त्यावर विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आजचा निकाल राखून ठेवला आहे.आता पुढची सुनावणी वेळापत्रक ठरवून १३ ऑक्टोबरला होणार आहे. शिंदे गटाचे वकील अनिल साखरेंनी बाजू मांडली तर ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामतांनी बाजू मांडली.
दोन्ही गटाचा युक्तीवाद
याचिका एकत्र करा अशी आमची मागणी आहे,ते का केले जात नाही,दाखल झालेल्या याचिकांचा विषय एकच आहे. त्यामुळे त्यावर सुनावणी घेणे सोपे होईल असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांंनी केला.तर याचिका एकत्र घ्यायला शिंदे गटाचा विरोध आहे. सर्व याचिका एकत्र नको, वेगवेगळी सुनावणी घ्या असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकिल अनिल साखरे यांनी केला.आम्हाला या क्षणी शेड्युल १० लागू होत नाही.शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने आम्हाला दिले. याचिका वेगळ्या असल्या तरी प्रत्येक आमदारांचे वैयक्तिक म्हणणे सविस्तर ऐकून घ्या असे वकील अनिल साखरे यांनी म्हणणे मांडले.
दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वेळापत्रक ठरवण्यात येणार आहे. यासाठी आजचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.परंतु, ऑनलाईन सुनावणीबाबत जे स्टेटमेंट येत आहेत यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. म्हणून दोन्ही वकिलांच्या संमतीने आजचा निर्णय राखून ठेवतोय, पुढच्या वेळेस वेळापत्रकानुसार सुनावणी घेऊ असे अध्यक्षांनी आजच्या सुनावणीत सांगितले. विधानसभा अध्यक्ष प्रेस नोटद्वारे सुनावणीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.
यावर्षी निकाल लागणे कठिण
दरम्यान आमदार अपात्रता प्रकरणात महत्वाची माहिती समोर येत आहे.आमदार अपात्रता प्रकरणी निकाल यावर्षी लागणे कठीण दिसत आहे कारण संभाव्य वेळापत्रकात कागदपत्रं तपासणी, साक्ष नोंदवणे आणि उलट तपासणीचा समावेश आहे. या प्रकियेला किमान तीन महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असल्याने सुनावणीची शक्यता कमी आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल यावर्षी लागण्याची शक्यता दिसत नाही
सरकारं बदलतात, किंमत मोजावी लागणार : खा.संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांना इशारा
आमदार अपात्रेप्रकरणी आज (२५ सप्टेंबर) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.अशातच खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना सूचक इशारा दिला आहे.
“विधानसभा अध्यक्षांना संविधान, घटना आणि कायदा पाळावा लागेल.आज तुम्ही त्याचे उल्लंघन केले आहे पण, भविष्यात सरकार बदलतात. तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “सगळी यंत्रणा निर्ढावलेली आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश मानायला तयार नाहीत.त्यांच्याकडे लोकशाही संदर्भात कोणती अपेक्षा ठेवायची? एका राजकीय पक्षाचे नेते आहात आणि विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलात हे मान्य. पण, शेवटी देशातले संविधान, घटना आणि कायदा तुम्हाला पाळावा लागेल.
आजच्या सुनावणीत काय घडले?
शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले, “आजच्या सुनावणीत प्रत्येक पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. त्यात प्रत्येक पक्षाकडून आपली बाजू मांडण्यात आली. ही सुनावणी कधी होणार, याचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला आहे. सुनावणी ऑनलाईन पद्धतीने व्हावी, असे अनेकांचे म्हणणं आहे. याबद्दल अध्यक्षांनी नाराजी व्यक्त
केली आहे.