मोठा निर्णय : महिला पोलिसांना आता १२ ऐवजी ८ तास असणार ड्युटी

0
27
मोठा निर्णय : महिला पोलिसांना आता १२ ऐवजी ८ तास असणार ड्युटी

मुंबई, वृत्तसंस्था । राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून महिला पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले असून, त्यांना आता १२ ऐवजी ८ तासांची ड्युटी असणार आहे.

महाराष्ट्र सरकारने महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी दिली आहे.

कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार – सुप्रिया सुळे
“महाराष्ट्र सरकारने महिला पोलीसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून यामुळे अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार.” असं खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट्द्वारे म्हटलं आहे.

पोलीस विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांकडून वारंवार ८ तासांची ड्युटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करत पोलीस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण मधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची ८ तासांच्या ड्युटी या अगोदर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे. पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याबाबत माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here