जळगाव : प्रतिनिधी
अचल संपत्तीबाबत वारस नोंद करतांना पाळधी बु॥ येथील तलाठ्याने कुठलीही चौकशी न करता आलेल्या अर्जावर एकाच दिवसात पोलीस पाटलाच्या दाखल्यावरुन वारस नोंद लावत स्वत: सर्कल, तहसिलदार व न्यायाधीशाचीही भूमिका बजावत वारस नोंद लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पाळधी बु॥ तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या महाशयांना कुणाचा वरदहस्त आहे याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान, सदर प्रकाराबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालून कारवाई करावी असा सूर सुज्ञ नागरिकांमधून येत आहे.
याबाबत समजलेले हकीकत अशी की, पाळधी बु॥ येथील रहिवासी राजेंद्र प्रल्हाद नन्नवरे यांचा ८ फेबु्रवारी २०२१ रोजी मुंबई येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी जयश्री राजेंद्र नन्नवरे (मुंबई) आई लक्ष्मीबाई प्रल्हाद नन्नवरे व दोन भाऊ (भुसावळ) असे आहे. राजेंद्र नन्नवरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडीलोपार्जित चल-अचल संपत्तीवर वारस म्हणून भारतीय वारस हक्क कायदा १९५६ चे परिशिष्ट १ मधील तरतुदीनुसार पहिल्या वर्गातील वारस म्हणून आईच्या नावाची नोंद होणे गरजेचे आहे. यानुसार पत्नी जयश्री नन्नवरे व आई लक्ष्मीबाई नन्नवरे असे कायदेशीर दोन वारस लागले पाहिजे. मात्र मयताची पत्नी जयश्री राजेंद्र नन्नवरे यांनी १८ मार्च २०२१ रोजी पाळधी बु॥ येथील पोलीस पाटील यांच्याकडे वारस दाखल्याची मागणी केली. सदर दाखला पोलीस पाटलांनी अत्यंत तातडीने देत त्याच्यावर मयताच्या पत्नीचे एकमेव नाव जयश्री राजेंद्र नन्नवरे असे असल्याचा दाखला दिला. या दाखल्यावरुन जयश्री नन्नवरे यांनी १८ मार्च २०२१ रोजीच तलाठी यांच्याकडे मयताच्या संपत्तीवर वारस लागण्याकामी अर्ज दाखल केला. सदर अर्जावर कुठल्याही प्रकारची चौकशीची तसदी न घेता तलाठी महाशयांनी १९ मार्च २०२१ रोजी संपत्तीवर वारस नोंदी करत तसा दाखला अर्जदार जयश्री नन्नवरे यांना दिला. इतक्या तत्पर कार्य करत तलाठ्याने वारस हक्क कायद्यासंदर्भात कोणता ‘अर्थ’ समजून दाखला दिला. हे कळण्याइतपत कुणी दुधखुळे नाहीत. इतकेच नाही तर अर्जदार जयश्री नन्नवरे यांनी अर्जामध्ये मिळकतीच्या वर्णनामध्ये सव्हे नं. ३०१, २९५, २०९, २९२ व ३०० इतक्या गट नंबरच्या उल्लेख केला असतांना या महाशयांनी अर्थाअर्थी समजून अति कर्तव्यदक्षता बाळगत गट नं.३०२ वरील नोंद लावून दिली.
वारस नोंदीसाठी १९७०च्या अगोदर तलाठी यांच्या केलेल्या नोंदी ग्राह्य धरल्या जात होत्या. मात्र, १९७० नंतर कायद्यात बदल झाल्यानंतर वारस दाखल्यासंदर्भात तहसिलदाराचा दाखला किंवा सस्केशन/हेअरशिप कायद्यानुसार दिवाणी न्यायालयाचे सर्टीफिकेट आवश्यक करण्यात आले आहे.
कायद्याने मयत व्यक्तीच्या पश्चात मयत व्यक्तीने केलेले मृत्यूपत्र किंवा भारतीय कायद्यानुसार १६ प्रकारचे वारस ग्राह्य धरले जाते. वारस दाखला मिळतांना सर्कल चौकशी तसेच वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेले पब्लिक नोटीफिकेशन या सर्व बाबी पूर्ण करत संबंधित न्यायव्यवस्था संबंधित वारसाला वारस दाखला देते. मात्र, पाळधी बु॥ येथील तलाठी व पोलीस पाटलांनी सर्व कायदेशीर नियम धाब्यावर बसवत वारस नोंदी केल्याचे समजते. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देवून या अनागोंदी कारभार करणार्या तलाठी व पोलीस पाटील यांच्यावर चौकशी करुन चाप लावत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.