मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यावर आंदोलनाचा प्रयत्न
रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात
मुंबई (प्रतिनिधी ) –
महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यावर आक्रमक होत त्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
महिला दिनानिमित्त रोहिणी खडसे यांनी आज सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून थेट राष्ट्रपतींना स्वसंरक्षणासाठी खून करण्याची परवानगी महिलांना द्यावी अशी मागणी केली. या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली असतानाच त्यांनी महिलांच्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी सह्याद्री गेस्ट हाऊस गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारावे अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट नाकारल्यामुळे रोहिणी खडसे संतप्त झाल्या. त्यांनी आंदोलनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यानंतर रोहिणी खडसे यांनी सरकारवर दडपशाहीचा आरोप केला. “मी महिलांच्या मागण्या मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती, पण ती नाकारण्यात आली. पोलिसांनी मला अडवले, हा लोकशाहीचा अपमान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी खडसे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे.