जामनेर ः प्रतिनिधी
महिलांनी दशसूत्री कार्यक्रम राबवून गट सक्षम करावेत व शाश्वत उपजीविका निर्माण कराव्या. ज्या वस्तू आपण शहरातून गावात मागवतो त्याच गावात कशा मिळतील व निर्माण होतील याकडे लक्ष द्यावे. जेणे करून गावांचा शाश्वत विकास होईल. तसेच महिलांनी एक पूरक व्यवसाय म्हणून गांडूळ खत निर्मिती देखील करावी व ते गांडूळखत आपल्या स्वतःच्या शेतात तसेच उर्वरित खतही शेतकर्यांना विकून त्यातून पैसा कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकर यांनी यावेळी सांगितले.
पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकर यांनी तालुक्याला भेट देऊन पाणी फाउंडेशनमध्ये काम करणार्या गावांना भेटी दिल्या व ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जामनेर पंचायत समितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात महिला बचत गटाच्या उमेद अंतर्गत काम करणार्या महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी जे.व्ही.कवडदेवी या देखील होत्या. ते पुढे म्हणाले की, जनावरांसाठी दुभत्या गाई म्हशी व शेळ्या मेंढ्या पाळून शेती पूरक व्यवसाय करावा. म्हणजे कमी भांडवलात ग्रामीण भागात उद्योग उभे राहून आत्मनिर्भर भारत निर्माण होण्यास हातभार लागेल. त्यांनी तालुक्यातील नांद्रा प्र.लो. सवतखेडा, चिंचोली पिंपरी या या गावांना भेटी दिल्या. यावेळी चिंचोली पिंपरीचे सरपंच विनोद चौधरी यांनी पाणी फाउंडेशन अंतर्गत झालेल्या कामांची माहिती देऊन माहितीपट दाखवला.
यावेळी गटविकास अधिकारी जे.व्ही.कवड देवी, सुखदेव भोसले, विभागीय समन्वयक उत्तर महाराष्ट्र, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत जामनेर तालुका मार्केटिंग कार्यशाळा जिल्हा व्यवस्थापक हरेश्वर भोई, पाणी फाऊंडेशन जिल्हा संपर्क प्रमुख भोसले, जामनेर तालुका पाणी फाउंडेशन संपर्क प्रमुख तुषार तायवाडे, तालुका व्यवस्थापक अमोल नप्ते, तालुका आर्थिक समावेशन तथा प्रभाग समन्वयक कैलास गोपाळ, प्रभाग समन्वयक बदाम जाधव, अण्णा दोंड, शिवाजी करपे, संतोष तेलंगे आदी उपस्थित होते.