महावितरणकडून चार लाख ११ हजार थकबाकीदारांना नोटीस

0
14

जळगाव ः प्रतिनिधी
महावितरण कंपनीतर्फे वीजबिल वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून थकबाकीदार वीज ग्राहकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जळगाव परिमंडळ अंतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ४ लाख ११ हजार ४६२ वीज थकबाकीदार ग्राहकांना मेसेज, ई-मेलसह पत्राद्वारे या नोटीसा देण्यात आल्या आहेत. १५ दिवसांचा नोटीस काळ पूर्ण केलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या ग्राहकांकडे १,३४१ कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी थकीत आहे.
कोरोना काळात थकलेल्या वीजबिल वसुलीच्या मोहिमेला महावितरणाकडून गती देण्यात आली आहेे. त्यामुळे ग्राहकांचे आधी टाळेबंदीने आणि आता वाढत्या महागाईमुळे कंबरडे मोडत असल्याने वसुलीचे पडसाद उमटू लागले आहे. विविध राजकीय पक्षांकडून या नोटीसी विरोधात आंदोलनेही सुरु झाली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळात वीज देयकांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला होता. त्यानंतर थकबाकीदार वीज ग्राहकांना वीजबिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरण कंपनीने दिली. मात्र, वीज देयकांच्या थकबाकीचा डोंगर वाढत चालल्यामुळे दैनंदिन कामकाज चालवणे महावितरण कंपनीला अशक्य झाले असल्याचा दावा महावितरण प्रशासनाकडून केला जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यवसायही ठप्प होते. सामान्य आर्थिकदृष्ट्या संकटात असतानाच महावितरणकडून वीज मीटर रिडिंग घेण्यात आले नाही, आणि अचानक वापरापेक्षा चौपट रकमेची आवाजवी व भरमसाठ वीज देयके पाठवली. याबाबत राज्य सरकारपर्यंत तक्रारीही पाठवल्या. यावर सरकारकडून आश्‍वासनही दिले. मात्र, पूर्तता झाली नाही.
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात खासगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रितसर परवानगी घेऊन सप्टेंबर २०२० मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरापासून सुरु केली. डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदारांची वीज न कापण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने वीज खंडित करण्यात येत आहे.
थकबाकीदार वीज ग्राहकांना १५ दिवसांपासून नोटीस पाठवण्यात येत आहेत. मुख्य कार्यालयाकडून ही प्रक्रिया सुरू आहे. ज्या वीज ग्राहकांचे संपर्क क्रमांक महावितरण कंपनीकडे रजिस्टर आहेत, त्यांना व्हाटॅस अ‍ॅप आणि एसएमएसद्वारे; तर ज्यांचे संपर्क क्रमांक नसलेल्यांना प्रत्यक्ष नोटीस पाठवल्या असल्याची माहितीही जनसंपर्क विभागाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here