महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला हे शोभेसे नाही; संजय राऊतांचे पुन्हा राज्यपालांवर टीकास्त्र

0
15

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारकडून देण्यात आलेल्या १२ नावांची यादी अखेर सापडली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे . राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “फाईल मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. फाईलवर राज्यपाल सही करतील तेव्हा संपूर्ण राजभवनाला आम्ही पेढे वाटू.

 

फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही आणि भुतं असली तर त्यांच्या आसपास असावीत. उच्च न्यायालयाने फाईलवर अद्याप निर्णय का होत नाही, असा प्रश्न विचारला आहे, ती फाईल बोफोर्स, राफेलची आहे का? भ्रष्टाचाराची आहे का?” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ही फाईल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने एकमताने १२ सदस्यांची नावे दिलेली आहे. त्यावर आठ महिने निर्णय होत नसेल तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते शोभेसे नाही. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामात गतिमानता दाखवली तर महाराष्ट्राची परंपरा गतिमान राहील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

तसेच सरसंघचालक मोहन भागवत अनेक विषयांवर परखडपणे मत व्यक्त करत असतात. म्हणूनच त्यांच्या भूमिकेला, मताला या देशात आजही महत्त्व दिलं जातं. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषतः गंगेच्या प्रवाहात हजारो प्रेते वाहून आली आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता, राममंदिराइतकाच महत्त्वाचा होता. त्यावर या देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा जनतेला होती. देशात आज जे सगळं काही सुरू आहे त्यावर आपलं मत व्यक्त करावं, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here