महापौर जयश्री महाजन आव्हान कसे पेलणार?

0
35

जळगाव : विशेष प्रतिनिधी
महापालिकेच्या इतिहासातील आजपर्यंतच्या महिला महापौरांमध्ये शिवसेनेच्या जयश्री महाजन यांच्या रूपाने सर्वात उच्च शिक्षीत महापौर लाभल्यामुळे त्यांच्याकडून जळगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सूत्रे हाती घेतल्यानंतर खड्डेमुक्त करण्याचा त्यांनी केलेला दृढ निर्धार हा जनेतला निश्‍चितच दिलासा देणारा असला तरी तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी होणे हे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. महापौर पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी गाळेधारकांचा प्रश्‍नही मार्गी लावण्याचा निर्धार बोलून दाखविला असला तरी ते मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. महानगरपालिकेला जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या रूपाने नवीन खेळाडू भेटले असून आता महापालिकेत ‘नवा भीडू नवा खेळ’ असा प्रयोग सुरू होणार असून या प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी दोघा पदाधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनाही कंबर कसावी लागणार आहे. जळगावचे नामकरण अलिकडे ‘धूळगाव’ असे करण्यात आले होते. ते नाव पुसण्यासाठी महापौर जयश्री महाजन यांना सर्वप्रथम धुळीपासून जळगावकरांचे मुक्तता करावी लागेल. व त्यानंतर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ही पूर्वीच्या राजवटीनेही दयनावस्था जळगावची केली आहे. ती दूर करण्यासाठी प्राधान्याने खड्ड्े बुजवण्याचे काम नव्या खेळाडुंना करावी लागणार आहे. अडीच वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीत जळगावकरांनी एक वर्षाच जळगावचा विकास करू अशा पोकळ आश्‍वासनांवर विश्‍वास दाखवून भाजपला ७५ पैकी ५७ जागा बहाल केल्या. मात्र जनतेची अडीच वर्षात घोर निराशा झाली व भाजपच्या नगरसेवकांना जनतेला उत्तर देणे कठीण झाले. त्याचाच परिपाक काल सत्तांतरात झाला व मनपावर भगवा फडकला. अडीच वर्षे विरोधी पक्षाची बजावतांना शिवसेनेने साततत्याने भाजपावर नागरी सुविधांच्या बाबतीत हल्लाबोल केला. आता बाजी पलटली आहे. कालपर्यंत विरोधात बसणारी शिवसेना आता सत्तारूढ झाली आहे. तर सत्तारूढ असलेला भाजपा आता विरोधात बसणार आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर पदाचा हा मुकुट काटेरी आहे हे विसरून चालणार नाही. जळगावकरांच्या मुलभूत नागरी सुविधा सोडविण्यासाठी आता महापौर महाजनांना ‘जय श्री’ करावी लागणार आहे. हे आव्हान महापौर सौ. महाजन कशाप्रकारे स्विकारतात व या काटेरी वाटचालीतून यशस्वी मार्ग कसा शोधून काढतात हे येणार्‍या काळात स्पष्ट होईलच.
जळगाव मनपामध्ये जे सत्तांतर झाले याबाबत शहरात उलट सुलट चर्चा असली तरी शिवसेनेच्या हाती सत्ता आल्यामुळे व राज्यातही शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्यामुळे राज्य सरकार विकासासाठी निधी उपलब्ध करून देईल व त्यातून जळगावातील रस्त्यांसह मुलभूत प्रश्‍न मार्गी लागतील अशी भाषा जळगावकर व्यक्त करीत आहेत. आता जे काही करायचे आहे ते नवीन खेळाडूंनी करायचे आहे व त्यांना सर्व ४५ नगरसेवकांनी साथ द्यायची आहे. ‘आता नवी भीडू नवा खेळ’ कसा रंगतो हे बघावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here