जळगाव ः प्रतिनिधी
मेहरुण परिसरातील प्रभाग क्र.१४ मधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील विविध नागरी समस्यांबाबत नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांना सामाजिक कार्यकर्त्या अनुताई कोळी यांचे निवेदनाद्वारे साकडे
शहरातील सत्तांतरानंतर नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यात त्यांना विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांसह सामाजिक कार्याकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत महापालिका क्षेत्रातील समस्यांबाबतही अवगत करण्याचे प्रयत्न चालविले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अनुताई कोळी यांनी नवनिर्वाचित महापौर जयश्री महाजन यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मेहरुण परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या समस्यांबाबत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, या उद्यानात सकाळी व संध्याकाळी वॉकींग करणार्या नागरीकांची मोठी वर्दळ असते. त्यात ज्येष्ठ नागरीकांचा मोठा सहभाग आहे. मात्र या उद्यानात पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने त्यांना अंधारात अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे असलेले विनाकामाचे वेस्टेज मटेरियल उचलण्यात यावे, उद्यानात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा साचलेला आहे त्याची साफसफाई करावी, नागरीकांसाठी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात यावी, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी असावी, उद्यानात असलेल्या विहिरींना लोखंडी जाळ्या बसविण्यात याव्या व त्या विहिरींचे तुटलेले कठडे दुरुस्त करण्यात यावे, उद्यानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, उद्यानाच्या लागून असलेले मेहरुण स्मशानभूमी विकसित करण्यात यावी याचबरोबर मेहरुण तलाव परिसरातील सप्तश्रुंगी देवीच्या मंदिराकडून रामेश्वर कॉलनीकडे जाणार्या रस्त्यावरील लोखंडी बॅरीकेट्स मधून किमान मोटारसायकल जाईल किंवा छोटी रिक्षा जाईल इतका रस्ता करुन शेतकरी बांधवांसह विद्यार्थी व चाकरमान्यांना दिलासा द्यावा. शांतीनारायण नगर, गजानन नगर, सिध्दार्थ नगर, रामेश्वर कॉलनी, मंगलपूरी या परिसरातील रहिवाशी महिलांची पाण्याची भटकंती थांबवावी. जकात सोसायटीजवळ तलाव परिसरात जाण्यासाठी पूल तयार करण्यात यावा. मेहरुण तलावाच्या परिसरातील काटेरी झुडपे तसेच पाण्यावर असलेला गवताचा विळखा काढून तलावाचे सौंदर्य वाढवावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहे.