महापालिकेचे राजकारण : जयश्री महाजन शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार?

0
32

जळगाव ः प्रतिनिधी
नव्या महापौर निवडीला अवघे तीन दिवस बाकी असताना अकस्मात घडलेल्या राजकीय भूकंपामुळे पक्षीय समिकरणे वेगाने बदलू लागली आहेत.मावळत्या महापौर भारती सोनवणे यांचे पती आणि भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे या घडामोडींमध्ये रात्री उशिरापर्यंत भाजप नेत्यांबरोबर होते मात्र, त्यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे नगरसेवक भाजपला प्रतिसाद देत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेे.
रविवारी रात्री कैलास सोनवणे हे जळगाव विमानतळावर जमलेल्या भाजप नेत्यांबरोबर होते.भाजपच्या नगरसेवकांशी ते फोनद्वारे संपर्क करीत होते. मात्र, त्यांच्या गटाचे म्हणून ओळखले जाणारे १० ते १२ नगरसेवक त्यांच्यासमवेत नव्हते,अशीही खात्रीशीर माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्यापैकी अनेकांशी संपर्कच होत नव्हता तर कोणी तब्बेत बरी नाही, कोरोनाची लक्षणे जाणवत आहे, अशी कारणे देत होते अशीही माहिती अंतर्गत सुत्रांकडून मिळाली आहे.
एक नगरसेवक फुटला
पाळधी येथे गेलेल्या भाजपच्या नगरसेवकांपैकी एक नगरसेवक ऐनवेळी तिथून निसटल्याचीही माहिती आहे. आपल्याला सर्दी झाली असून कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत.त्यामुळे आपण टेस्ट करून घरीच थांबू. आपण शिवसेनेबरोबरच आहोत, चिंता करू नये, असे या नगरसेवकाने सांगितले.त्यामुळे त्याला तिथून जाऊ देण्यात आले. तिथून निघून हा नगरसेवक थेट भाजप नेत्यांना जाऊन मिळाला, अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांत होती.
जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील?
दरम्यान, शिवसेना महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी अर्ज विकत घेणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेतर्फे नगरसेविका जयश्री महाजन या महापौरपदाच्या उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. उपमहापौरपद फुटलेल्या भाजप नगरसेवकांपैकी कोणाला मिळते, याविषयी मात्र उत्सुकता आहे. कुलभूषण पाटील यांना ते पद दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपची उमेदवारी कापसेंना
भाजपतर्फे महापौरपदाची उमेदवारी प्रतिभाताई कापसे यांना देण्याचा निर्णय झाला होता.उपमहापौरपद धीरज सोनवणे यांना देण्याचेही पक्ष नेतृत्वाने नक्की केले होतेे. बदललेल्या परिस्थितीतही हेच उमेदवार भाजप कायम राखेल की त्यात बदल करेल, हे उमेदवारी दाखल करतानाच स्पष्ट होणार आहे.
उमेदवारीमुळे नाराजीचा सूर
भाजपने महापौर, उपमहापौर पदासाठी जी नावे निश्चित केली, ती मान्य नसल्याने नगरसेवक फुटले आहेत, असे नेत्यांना सांगण्यात येत होते. उमेदवार बदलले तर कदाचित चित्र बदलेल, अशी शक्यताही होत होती. कैलास सोनवणेंनी ठरवले तर त्यांचे समर्थक नगरसेवक भाजपबरोबर येऊ शकतात व शिवसेनेचे गणित बिघडू शकते, असेही सुत्रांचे म्हणणे आहे.
धुळे मार्गे मुंबईकडे रवाना
प्राप्त माहितीनुसार भाजपचे २४ आणि एमआयएमचे तीन असे २७ नगरसेवक एका खासगी आराम बसने पाळधीहून दुपारनंतर धुळ्याकडे रवाना करण्यात आले. त्याआधी पाळधी येथे गुलाबराव पाटील यांच्या फार्म हाऊसवर त्यांना आग्रहाने जेवण देण्यात आले. धुळ्याला पोहोचल्यावर आणखी आरामदायी अशा नव्या बसेसमध्ये त्यांना बसवून मुंबईकडे रवाना करण्यात आले. मात्र, थेट मुंबईत नेण्याऐवजी त्यांना ठाणे जिल्ह्यात नेले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. तिथे मंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहुणचार त्यांना मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here