जळगाव- मराठा विद्या प्रसारकचे संचालक अॅड. विजय भास्कर पाटील यांना धमकावून खंडणी वसुल केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यासह 29 संशयीतांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल प्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलिसांकडून जळगावात रविवारी पहाटे पाच ठिकाणी छापे मारण्यात आले.
याच प्रकरणातील नऊ जणांवर मोक्काची कारवाई करण्याच्या हालचालीना गतिमान आली आहे. या पार्श्वभूमीवरमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर काही आरोप केले आहेत. मोक्कांतर्गत कारवाई सुरू झाली असतानाच गिरीश महाजनांना कोरोना तर झाला नाही ना? अशी शंका उपस्थित केली होती. या वक्तव्यानंतर रविवार पहाटेच नीलेश रणजीत भोईटे, तानाजी भोईटे, महेंद्र भोईटे, प्राचार्य एल.पी. देशमुख व प्रमोद काळे यांच्या जळगावातील निवासस्थानी पुण्यातील कोथरूड पोलिसांचे सुमारे 70 कर्मचार्यांचे पथकाने छापे मारले. ही कारवाई पोलीस उपायुक्त सुषमा चव्हाण ) यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे.
नऊ जणांवर मोक्कांतर्गत कारवाईच्या हालचाली
मविप्र वादात भोईटे गटाला मदत करीत आमदार महाजन व त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड.विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलिसात केली आहे. हा गुन्हा पुण्यातील कोथरूड पोलिस स्थानकात वर्ग झाला. या प्रकरणातील नऊ संशयीतांविरोधात मोक्कांतर्गत कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या आहे.
काय आहे प्रकरण ————–
अॅड.विजय भास्कर पाटील यांच्या तक्रारीनुसार त्यांना संशयीत आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावल्यानंतर शिविगाळ करीत दमदाटी केली. ही घटना सदाशीव पेठेतील एका फ्लॅटवर घडली. यात पाटील यांच्या गळ्याला व पोटाला चाकू लावला. सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. ही घटना जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडली. याप्रकरणी उशिराने निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येवून तो वर्ग करण्यात आला.