‘मविप्र’च्या सभेत गिरीश महाजनांच्या निषेधाचा ठराव

0
18

जळगाव ः प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगावची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने काल झाली. या सभेत आमदार गिरीश महाजन यांच्या निषेधाचा ठराव मांडून त्यास मंजुरी देण्यात आली.
विजय पाटील यांची निवड
ऍड. विजय पाटील यांची सर्व सभासदांतर्फे सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या सभेत एकूण आठ विषयांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषय मंजूर करण्यात आले. या वेळी संचालक मंडळातर्फे सर्व सभासद बांधवांना वाढत असलेल्या कोरोना संबंधी काळजी घेण्याचे आवहन करण्यात आले. संस्थेतर्फे कुठलाही आयत्या वेळचा विषय नव्हता. सभासदांमधून विनोद पंजाबराव देशमुख यांनी आयत्या वेळचा विषय मांडला.
गेल्या तीन वर्षांपासून गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने संस्थेच्या संचालक मंडळाला छळले व खोटे गुन्हे दाखल केलेत. संस्थेच्या मालकीची असलेली हजारो कोटींची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न केला. या सर्व बाबींचा जाहीर निषेधाचा ठराव देशमुख यांच्याकडून मांडण्यात आला. सभासदांनी एकमताने गिरीश महाजन यांचा निषेध नोंदवत मंजुरी दिली, अशी माहिती संस्थेचे संचालक ऍड. विजय पाटील यांनी दिली.
रमेश धुमाळ यांची फिर्याद
२७ मार्च रोजी नूतन मराठा महाविद्यालयात सुमारे ५० जणांचा जमाव आत शिरला.त्यांनी दोन सुरक्षारक्षक व दोन कर्मचार्‍यांना लोखंडी हातोड्याने मारहाण करुन नीलेश भोईटे यांच्या कारच्या काचा फोडल्या, सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केल्याची फिर्याद रमेश दगडू धुमाळ (वय ४०, रा. चिंचोली, ता. जळगाव) यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी ऍड. विजय पाटील, महेश आनंदा पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयितांकडून ३१ मार्च रोजी संस्थेच्या कार्यालयात गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संशयितांवर कठोर कारवाई करावी असे निवेदन फिर्यादी रमेश धुमाळ यांनी काल जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here