विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत केवळ १५ मतांनी तीन जागा जिंकलेल्या शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना माझ्याविरोधात निवडणूक लढविण्याची भाषा करण्याचा नैतिक अधिकार नाही सोयगावात भाजप भक्कमच आहे सोयगाव भाजपचाच बालेकिल्ला आहे १५ मते पडली नसती तर चणे – फुटाणे खिशात घेऊन फिरणाऱ्या सत्तारची काय अवस्था झाली असती , हे मी सांगायला नको , असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली . सोयगाव नगरपंचायतीच्या निकालानंतर सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली होती . याच अनुषंगाने बनोटीत एका खासगी कार्यक्रमात दानवे यांनी सत्तारांनी केलेल्या आरोपाचे खंडन केले . सोयगाव नगरपंचायत शिवसेनेने एकहाती घेतलीच नाही , तीन जागा १५ मतांनी विजयी झाल्या आहेत . शिवसेनेनेच आत्मपरीक्षण करावे , असा टोला दानवे यांनी सत्तारांना लगावला . मुळातच मी शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस आहे , घरात माझ्यानंतर कोणीही शिकलेला नाही , त्यामुळे मला वखरावर काम करण्याची सवय आहे , ही सवय राज्यमंत्री सत्तार यांनी लावून घ्यावी , असेही दानवे म्हणाले . राज्यमंत्री सत्तार यांनी टोपी घालावी की नाही याबाबत मी सांगत नाही , टोपी घालावी की नाही हा ज्याचा त्याच्या मनाचा प्रश्न आहे . मला पराभूत करण्याचे स्वप्नही सत्तारांनी कदापि पाहू नये , असेही दानवे म्हणाले .