मलकापुर : प्रतिनिधी
शहरातील स्थानिक सिनेमा रोडवरील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास दुकानांना आग लागल्याची घटना घडली. या लागलेल्या आगीत सात दुकाने जळून खाक होत दुकानांमधील करोडो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्थानिक सिनेमा रोडवरील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत संत रमेती राम टोबॅको, सुरजमल अॅन्ड कंपनी, गांधी बुक डेपो, हारूण अजीज यांची दुकाने व गोडाऊन जळून खाक झाली तर अग्रवाल स्टोअर्स व हिरालाल दिपचंद अग्रवाल यांच्या दुकानांचेही आगीत मोठे नुकसान झाले आहे.
रात्रीच्या सुमारास आगीची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व अग्नीशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते. तर पोलीसांसह अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळावर धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरातील अग्निशमन दलाच्या २ बंबांसह विरसिंग नरसीभाई दंड, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली. जवळपास ५ तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, आगीच्या भक्षस्थानी असलेल्या व्यापार्यांची दुकाने जळून खाक होत त्यांची आयुष्यभराची कमाई जळुन खाक झाली असल्याची भावना नागरीकांना होती. या आगीत अंदाजे एक कोटींपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून अद्यापपर्यंत आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मलकापूर पोलीस स्थानकात आगीची नोंद करण्याचे काम सुरु होते.