मर्म बंधातली ठेव ही.. हा नाट्यसंगीतावर आधारीत विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण

0
26

जळगाव, प्रतिनिधी। स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने 20 व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई येथील श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, वेदश्री ओक यांच्या मर्म बंधातली ठेव ही… या नाट्यसंगीताच्या मैफलीने जळगावकर रसिकांच्या हृदयात आनंदोत्सव जागवला. नाट्यसंगीताच्या कलाकृतीच्या सादरीकरणाने बालगंधर्व महोत्सवाची उंची वेगळ्या उंचीवर गेली.
बालगंधर्वच्या दुसऱ्या दिवसाच्या नाट्यसंगीत मैफलीला पंचतुंड नररूंडमालधर, शाकुंतल या संगीत नाटकातील नांदी आजच्या कार्यक्रमाची बहारदार सुरवात झाली. या कार्यक्रमाचे निरूपन सुसंवादिका दिप्ती भागवत यांनी केले. मराठी रंगभुमी ही चिरंजव असून याला वैभवशाली इतिहास आहे. ही रंगभूमी भविष्यातही रसिकांचे मनोरंजन करत राहिल. अशा शब्दात रंगभुमीची आत्मकथा दिप्ती भागवत हिने ऐतिहासिक संदर्भासह सादर केली. यानंतर नाट्य संगिताच्या मुख्य कार्यक्रमाला ‘वद जाऊ कोणाला शरण गं..’ या अजरामर नाट्यसंगीताने वेदश्री ओग हिने सुरवात केली. यानंतर श्रीरंग भावे यांनी महानंदा कादंबरीवर आधारित मत्स्यगंधा नाटकातील गुंतता हृदय हे… हे नाट्यपद सादर केले. तर मानापमान या शं.ना.नवरे यांच्या नाटकातील ‘चंद्रिका ही जणू..’ हे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे सुप्रसिद्ध पद धनंजय म्हसकर यांनी सादर केले. तदनंतर संन्यस्थ खंड्ग या नाटकातील मर्म बंधातली ठेव ही.. हे पद वेदश्री ओक हिने सादर केली. संगीत कुलवधू मधील कितीतरी आतुर प्रेम आपुले हे नाट्यपद श्रीरंग भावे यांनी सादर केले. या पाठोपाठ ययाती आणि देवयानी या नाटकातील अभिषेकी बुवा यांचे हे सुरांनो हे नाट्यपद गायिले. स्वराभिषेक या जितेंद्र अभिषेक यांच्या संग्राहातील दिव्य स्वातंत्र्य रवी ने धनंजय म्हसकर यांनी सादर केले. वसंतराव देशपांडे यांच्या कट्यार काळाजात घुसली या नाटकातील घेई छंद मकरंद हे नाट्यगित सादर केले. नाट्यसंगीत मैफल सादर करणाऱ्या कलावंतांना मकरंद कुंडले, धनंजय पुराणिक, प्रमोद जांभेकर यांनी साथसंगत दिली.
*चांदोरकर प्रतिष्ठानच्या द्विदशकपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन*
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे प्रायोजीत स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, तसेच दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्मरणिका प्रकाशन करण्यात आली. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, नागपूरचे दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक शशांक दंडे, जैन इरिगेशन सिस्टम्स ली.चे मानव संसाधन विभागाचे विश्वप्रसाद भट, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, दिपक चांदोरकर,संपादक मंडळातील अमृता करकरे, प्रा. शरदचंद्र छापेकर, अरविंद देशपांडे यांच्यासह कलावंताची उपस्थिती होती. अमृता करकरे यांनी स्मरणिकेबाबत माहिती दिली. स्मरणिका प्रकाशनासाठी मल्टीमिडीया फिचर्स ली.चे सुशिल नवाल यांच्या सहकारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.नाट्यसंगीताची मैफिलचे सादरीकरण करणाऱ्या कलावंताचे प्रतिष्ठानच्या वतीने पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
*आज धृपद गायन आणि तबला पखवाज जुगलबंदी*
बालगंधर्व संगीत महोत्सवात उद्या दि.८रोजी पं.विनोदकुमार व्दिवेदी आणि आयुष व्दिवेदी यांचा धृपद गायनाने रंगत भरेल. तर दुसऱ्या सत्रात पं. कुमार बोस व कृणाल पाटील यांच्यात तबला पखवाज जुगलबंदी रंगणार आहे.
*पं. विनोदकुमार द्विवेदी व आयुष द्विवेदी (कानपूर)* धृपद गायन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पं. विनोद कुमार द्विवेदी यांचे नाव द्रुपद गायनात अत्यंत आदराने घेतलं जातं त्यांनी स्वतःला एक उत्कृष्ट धृपद गायक म्हणून प्रस्थापित केले आहे. एक उत्तम गायक, उत्तम गुरु, उत्तम संगीतकार व उत्तम लेखक म्हणून पं. विनोद कुमारांची जगभर ख्याती आहे. पं. विनोद कुमार द्विवेदी यांनी आत्तापर्यंत सुमारे ५०० धृपद- धमार, खयाल, चतुरंग, भजन, व गीते यांचे लेखन व संगीत दिग्दर्शन केले आहे. ह्या सर्व संगीत रचना भारतीय अभिजात संगीतावर आधारित आहेत. धृपद-धमार गायनाबरोबरच पंडितजी खयाल, भजन, ठुमरी, चतुरंग इ. गायन प्रकारही गातात.
*पं. कुमार बोस (कोलकाता)*- पंडित कुमार बोस यांचे शिक्षण उस्ताद डबीर खान यांच्याकडे सुरू झाले, त्यानंतर बनारस घराण्याचे पं. किशन महाराज यांच्याकडे त्यांचे शिक्षण सुरू झाले. संपूर्ण जगभरातील रसिकांवर पं. कुमार बोस यांनी आपल्या तबला वादनाचे नुसतेच गारुड केले आहे. तबला वादनात त्यांनी आपली स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली परंतु त्याच वेळी बनारस घराण्याची परंपरा व संस्कार याला त्यांनी कुठेही धक्का पोहोचू दिला नाही. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर बनारस घराण्याच्या प्रतिनिधित्व करणारे पं. कुमार बोस यांचे तबलावादन त्यांचाच उत्तम शिष्य कुणाल पाटील यांच्या पखवाज वादन व जुगलबंदी हे विसाव्या बालगंधर्व महोत्सवाचे आकर्षण असणार आहे.
*कुणाल सदाशिव पाटील* – कुणालने अतिशय लहान वया पासून पखवाज वादनाची सुरुवात केली. कुणाल बनारस घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे पं. कुमार बोस यांच्याकडे आपले पुढील शिक्षण घेत आहे. पखवाजाची थाप ही मानवी हृदयाला भिडते आणि एक अध्यात्मिक अनुभूती रसिकांना मिळते अशी शिकवण कुणालला आजोबा व काका यांनी दिली आहे. आत्तापर्यंत कुणाल ले भारतभर अनेक संगीत सभा व महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. यंदाच्या बालगंधर्व महोत्सवात कुणाल आपले गुरू पं. कुमार बोस यांच्यासोबत पखवाज ची जुगलबंदी सादर करणार आहे. या जुगलबंदीस पुण्याचे तरुण आश्वासक आणि चतुरस्त्र संवादिनी वादक मिलिंद कुलकर्णी हे नगमा अर्थात लेहऱ्याची साथ-संगत करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here