मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या मराठी भाषिक मान्यवरांचा सन्मान

0
56

जळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र,पिंप्राळाच्यावतीने दि.24 ते 26 जानेवारी 2022 पर्यंत मराठी भाषा संवर्धन हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना नियमावलीचे पालन करत हे सर्व कार्यक्रम ऑनलाईन स्वरुपात राबविण्यात आले.
.
या कार्यक्रमात दि. 24 जानेवारी 22 रोजी मराठी भाषेतील अभिजात ग्रंथ दासबोध, मोरोपंत लिखित केकावली, भगवदगीता यांचा परिचय तर दि. 25 जानेवारी 22 रोजी कवितावाचन व रसग्रहण कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर, शांता शेळके, ग. दि.माडगूळकर, भा.रा.तांबे, बालकवी, माधव ज्युलियन, श्रीकांत मोघे या नामवंत कवींच्या कविता स्पष्टीकरणासह कविता वाचन करण्यात आले. त्यानंतर  दि. 26 रोजी प्रजासत्ताक दिनी  विविध क्षेत्रात कार्य करुन  मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या मराठी भाषिक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात रोहिणी अग्निहोत्री (तत्वज्ञान आणि अध्यात्म), अशोकजी कोतवाल (ललित लेखन व काव्यलेखन),  योगेश शुक्ल (वृत्तपत्र , सोशल मीडिया लेखन), विनोदजी ढगे (लोककला,पथनाट्य), राजेश उपासनी (कविता लेखन), प्रफ्फुल आवारे (कामगार कवी, समाज कार्य), तृप्ती जाधव (पाटील) (शिक्षण व  सांस्कृतिक), मोरेश्वर सोनार (कथा,कविता,नाट्य), जितेंद्र कुवर (कथा,कविता लेखन), योगिता संजय पवार (आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन)  आदी मान्यवरांचा पुष्पगुच्छ, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक करताना कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर यांनी मराठी भाषेचे मातृभाषेसह राजभाषा म्हणून महती स्पष्ट करताना या भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या यशस्वी मराठी भाषिक मान्यवरांचा सत्कार करणे हे कामगार कल्याण मंडळाकरिता अभिमानास्पद असल्याचे मनोगत  व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार केंद्रसंचालक नरेश  पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुनिता पाटील, जागृती मोरे, आशा चव्हाण व अनिल कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here