धानोरा ता. चोपडा, वार्ताहर । सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी येथे काल दि १० रविवार रोजी सुटीचा दिवस असल्याने मनुदेवी च्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर चिंचोली मनुदेवी रस्ता खासगी वाहनांनी भरून गेला होता. भाविक मिळेल त्या वाहनांनी तर काही खासगी रिक्षा मोटरसायकल तसेच बसेस मधुन जाताना दिसुन येत होते. आज नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस असल्याने भाविकांची आता शेवटचे चार दिवस मोठी गर्दी दर्शनासाठी होणार असल्याने मनुदेवी संस्था व यावल पोलीस स्टेशनला नवरात्रोत्सव शांततेत व कोरोना नियमावलीत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
काल रविवार असल्याने भाविकांची गर्दी चा कल पाहाता मनुदेवी संस्थानने भाविकांच्या खासगी वाहनांना मानापुरी पासुन मनुदेवी मंदिर पर्यंत जाण्यास बंदी केली होती .त्याकरीता पार्किंग ची व्यवस्था ही करण्यात आली होती .मनुदेवी संस्थानचे विश्वस्त व स्वयंसेवक यावल पोलीसांचा ताफा तसेच होमगार्ड आदिची पार्किंग ठिकाणी सेवा बजाविताना दिसत होते. भाविकांना रांगेत सुरक्षित अंतर ठेवुन बसमध्ये चढण्यासाठी पोलीस व होमगार्ड मोठी मेहनत घेत होते. तर भाविकांनी तोंडावर मास्क लावुनच दर्शनासाठी जावे असे आवाहन मंदिर संस्थानचे विश्वस्त व स्वयसेवक ही करत होते .तर बरेच भाविकांनी तोंडावर मास्क लावलेले नसल्याने पोलीस व होमगार्ड भाविकांना समजविण्याचा प्रयत्न करताना दिसत होते .
यावल आगारातुन पंधरा बसेस
नवरात्रोत्सव व रविवार सुटीचा दिवस असल्याने वाढती गर्दी पाहता भाविकांना मानापुरी पासुन पुढे मंदिराकडे जाण्यासाठी दिवसभर यावल आगाराच्या पंधरा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यासाठी यावल आगार प्रमुख भालेराव व सहाय्यक संदिप अडकमोल हेही याठिकाणी बसेस वेळेवर लावण्यासाठी प्रयत्न करत होते .
मंदिरात ही रांगेत दर्शन
मनुदेवी मंदिरात भाविकांना रांगेत व सुरक्षित अंतर ठेवुन सोडले जात होते. दिवसभर हजारो भाविकांनी आज मनुदेवी मातेचे दर्शन घेतले.