मुक्ताईनगर ः प्रतिनिधी
राज्यात गुटखाबंदी असतांनासुद्धा मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटका विक्री होत आहे.तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ १३ जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास बर्हाणपूरकडून मुक्ताईनगकडे येत असलेल्या चारचाकी वाहनांमध्ये लाखो रुपयाचा गुटका पकडण्यात आल्याची चर्चा होती.या संदर्भात पोलिसात मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान महाराष्ट्राची सीमा असलेल्या इच्छापूर मध्यप्रदेशकडून महाराष्ट्राकडे एका चार चाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात गुटका वाहून नेत असल्याच्या माहितीवरून मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ सदर वाहनाची तपासणी केली.तपासणी दरम्यान या वाहनांमध्ये लाखो रुपयांचा गुटका असल्याचे आढळून आल्याची चर्चा आहे.
यावरून मुक्ताईनगर पोलिसात यासंदर्भात गुन्हा नोंद आहे काय याची चौकशी केली असता यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे सांगण्यात आले.इतकेच नव्हे तर पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्याशीही संपर्क साधला असता,या प्रकरणी कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याचे अथवा या संदर्भात माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नेमकी त्या वाहनाची तपासणी केली कुणी, गुटका आढळला असेल तर ते वाहन नेमके गेले कुठे,असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नुकत्याच दोन ते तीन दिवस आधी गुटका उत्पादक छाजेड यांना मुंबईत अटक करून पंधरा कोटीपेक्षा अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारची मोठ्या शहरात जर कारवाई होत आहे तर ग्रामीण भागात का कारवाई होत नाही, असाही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.उलट यामध्ये गुटका हा किरकोळ विक्रीमध्ये जादा भावाने विकला जात आहे. नेमके यात लागेबंधे कोणाचे, असाही प्रश्न नागरिकांना विचार करण्यास भाग पाडत आहे