धानोरा, ता. चोपडा ः प्रशांत चौधरी
होलिकोत्सव: सातपुड्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये तसेच मध्यप्रदेश या राज्यातील वरला, बलवाडी, पलसुद, सेंधवा, बडवाणी, खरगोन या गावांची भोंगर्या बाजाराची तयारी जोरात सुरू झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल लवकरच सुरू होणार आहे.
आदिवासी बांधवांची दिवाळी म्हणून ओळखल्या जाणारा भोंगर्या उत्सव व होलिकोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे़ आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने तयारीला लागले असून सातपुड्यांच्या पाड्यांवर ढोलचे निनाद ऐकू येऊ लागले आहेत़. २२ मार्च पासून भोंगर्या बाजाराला सुरुवात होणार आहे. सातपुडा परिसरातील खेड्यांमध्ये तसेच मध्यप्रदेशातील वरला, बलवाडी, बडवाणी, खरगोन, सेंधवा अशा मोठ्या बाजार पेठेतील गावांमध्ये देखील भोंगर्या बाजाराची तयारी सुरू झाली आहे. सध्याच्या डिजिटल युगात देखील सातपुड्याच्या कुशीत अजूनही परंपरा, चालीरिती टिकून आहेत़ हा वारसा आदिवासी बांधवांनी टिकून ठेवला आहे़ आपल्या मनातील वाईट विचार तसेच वाईट प्रवृत्तीला दहन करण्याचा संदेश देण्यार्या होळीचे आदिवासी बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे़ फाल्गुनी पौर्णिमेपासून सुरू होणार्या होलिकोत्सवात गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विखुरलेले पावरा, गावित, मावची, भिल्ल समाज एकत्र येत असतात़
यंदा मात्र आदिवासी बांधवाच्या या सणावर कोरोना रोगाचे सावट असल्याने भोंगर्या बाजार भरणार की नाही, या व्दिधा अवस्थेत आदिवासी बांधव आहेत.