भुसावळ प्रतिनिधी | शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांची जळगाव येथील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रशासनाने झाडाझडतीस प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. पंचशीलनगरातील धम्मप्रिय सुरळकर या तरुणाचा २० सप्टेबर रोजी नशिराबाद उड्डाण पुलाच्या खाली खून झाल्याने खळबळ उडाली आहे. पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड घडले असून यात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. समीरचा भाऊ मोहंमद कैफ याच्या खून खटल्यातील संशयित म्हणून धम्मप्रिय ११ महिन्यांपासून कारागृहात होता. जामीन मिळाल्यानंतर घरी जात असताना दोघांनी त्याचा खून केला. या दोन्ही कुटुंबीयांत वर्षभरपासून तणाव होता. तरी देखील पोलिसांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळले नसल्याचा ठपका वरिष्ठांनी ठेवला आहे. यामुळे पीआय दिलीप भागवत यांनी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याकडे प्रभारी चार्ज देण्यात आला आहे.