भुसावळ, वृत्तसंस्था । राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा बाळगून तो विक्रीसाठी रीक्षातून नेणार्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. संशयीताच्या ताब्यातून सुमारे 28 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 5 रोजी शहरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर करण्यात आली.
बाजारपेठ पोलिसांना काही संशयीत सिंधी कॉलनीत गुटखा घेण्यासाठी येणार असल्याची व गुटख्याची विक्री होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी साडेचार वाजता शहरातील पुरानी श्रीचंद दरबार सिंधी कॉलनीजवळ रीक्षा (क्रमांक एम.एच.19 बी.यु 3046) आल्यानंतर पोलिसांनी नवीन मोहनदास सोबानी (28, हनुमान नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ), भानुदास भीमराव तायडे (27, वांजोळा, ता.भुसावळ) व सय्यद सरफराज अली इलियाज अली (25, मारुळ, ता.यावल) यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी रीक्षाची झडती घेतली असता त्यात राज्यात प्रतिबंधीत असलेला सुमारे 28 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला तर रीक्षासह एकूण 78 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कर्मचारी प्रशांत नीळकंठ सोनार यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, उपनिरीक्षक महेश घायतड, प्रशांत सोनार, ईश्वर भालेराव, जीवन कापडणे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, बंटी कापडणे, अतुल कुमावत आदींच्या पथकाने केली. तपास उपनिरीक्षक महेश घायतड करीत आहेत.