भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जळगाव नाक्याजवळील मुंजोबा मंदिरासमोर दशमेश मार्गावर ट्रकने पुढे जाणार्या मारोती कारला जबर धडक दिली. या अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नसली तरी कारचे नुकसान झाले आहे. या रस्त्यावर असलेल्या खड्डे चुकवत असतांनाच हा अपघात झाला असल्याची चर्चा घटनास्थळी होती तर प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार ट्रकचालकाला अक्षरश: तेथे काम करीत असलेल्या मजुरांनी ट्रकला आपल्याकडे असलेल्या अवजारांनी ठोकत ट्रक थांबविला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अपघातामुळे या रोडवरील वाहतुक सुमारे अर्धातास खोळंबली होती. दरम्यान, शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली असून दुचाकीस्वारासह पादचार्यांनाही रस्त्यावरून जाण्याची भिती वाटत आहे. मात्र, सत्ताधारी विकासाच्या वल्गना करत आपल्याच मस्तीत असल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती.
याबाबत घडलेला वृत्तांत असा की, दशमेश मार्गावर मुंजोबा मंदिरासमोर पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरील पुलावरील एका बाजूची वाहतुक बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतुक एकाच बाजुने सुरु आहे. आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास जळगावकडून रावेरकडे वसंत पवार आपल्या कुटुंबियांसोबत मारोती कार (क्र.एम.एच.१५-आर.२३६३)ने जात होते. त्याच वेळी ट्रक (क्र.एच.आर.७३-ए.७३७६) हा ट्रकही जळगावकडून रावेरमार्गे दिल्लीकडे जात होता. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने तेथून जातांना वाहनधारकांना खड्डे वाचवत हळूवारपणे आपले वाहने चालवावी लागतात. मात्र ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने जात कारला जबर धडक दिली.अपघातानंतरही ट्रक चालकाने ट्रक न थांबविता जवळपास ५० फुटापर्यंत कारला फरफटत नेली. यावेळी कारमधील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने टाहो फोडला. मात्र ट्रकचालक आपल्या धुंदीत असल्याने तो काही ट्रक थांबवित नव्हता. ही घटना त्याच ठिकाणी पुलाच्या कामावर काम करत असलेल्या मजुरांना दिसली. मजुरांनी धाव घेत आपल्याकडे असलेल्या फावडे व टिकच्या साह्याने ट्रकला ठोकत ट्रकचालकाला ट्रक थांबविण्यास भाग पाडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कारमध्ये वसंत पवार त्यांच्या पत्नी
सुनिता पवार, दोन लहान मुले, बहिण व मेहुणे असे प्रवास करीत होते. या अपघातात वसंत पवार यांच्या मेव्हण्यांना पायाला दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते. पवार कुटुंबिय जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे वास्तव्याला असून ते त्यांच्या रावेर तालुक्यातील मुळगावी कामानिमित्त जात होते तर ट्रक हा सोलापूर जिल्ह्यातील वारसी येथून कांदे भरून दिल्लीकडे जात होता. दरम्यान, १० वाजेच्या सुमारास या रस्त्यावर गस्तीवर आलेल्या पोलीसांनी घटनास्थळी येत ट्रकचालकास व कारचालकास पोलीस स्थानकात घेवून गेले असता त्यांच्यात आपसात तडजोड झाल्याचे समजते.
शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत विदारक झाली असून अनेक दिवसांपासून या रस्त्यावर जाड खडी टाकून रस्त्याचे काम सुरु केले होते. मात्र आजपर्यंतही रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही. यामुळे नागरीकांना आपला जीव मुठीत घेवून ये-जा करावी लागत आहे. आजपासून शहरातील ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वर्दळ असते. या रस्त्यावर नेहमीच छोटे-मोठे अपघात घडत आहे. या अपघाताची दखल घेत सत्ताधारी आतातरी रस्त्याचे काम करणार आहे का? का एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का? असा सुर सुज्ञ नागरीकांमधून उमटत आहे.