भुसावळ ः प्रतिनिधी
शहरातील ग्रामिण रुग्णालय व ट्रामा कोविड डीसीसीएचमध्ये १४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. मात्र, बुधवारी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. पुरवठादारालाच एजन्सीकडून ऑक्सिजन मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली. अशा बिकट स्थितीत भाजपचे तथा अध्यक्ष, ओमः सिध्दगुरू नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ नी.तू.पाटील यांनी स्वखर्चातून सात हजार रुपयांचा १० सिलेंडरचा पुरवठा करुन दिला.
भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णालयात मागील एक वर्षापासून ऑक्सिजन पुरवठादाराचे सव्वादोन लाख रुपये थकीत आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेकेदाराला एक दमडी देखील दिली नाही. पुरवठादारांवरही एजन्सीचे देणे वाढल्याने तसेच तीव्र टंचाई असल्याने डिस्टीब्युटरने बुधवारी ऑक्सिजन पुरवठा बंद केला. यामुळे ग्रामिण रुग्णालयातही सिलेंडर उपलब्ध झाले नाहीत. बुधवारी सकाळी केवळ पाच सिलेंडर उपलब्ध होते. यामुळे केवळ सायंकाळपर्यंत रुग्णांना ऑक्सिजन देता येणार होता. यामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी चिंतेत होते. भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक तथा अध्यक्ष, ओमः सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ डॉ.नी.तू. पाटील यांना हा विषय समजल्यानंतर त्यांनी हिंदुस्तान एजन्सीतून सात हजार रुपयांचे तुर्त दहा सिलेंडर खरेदी करुन ग्रामिण रुग्णालयात पाठवले आहे. यानंतर मात्र पुन्हा सिलेंडरची गरज भासणार आहे. जिल्हा प्रशासकीय यंत्रणा, जिल्हा आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधी ही सर्व बिकट परिस्थिती पाहूनही ठोस निर्णय घेत नसल्याने १४ रग्णांचा जिव टांगणीला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा होत नसेल तर उपचार होतील कसे? असा प्रश्नही नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.