भुसावळ, प्रतिनिधी । महामार्गावरील बऱ्हाटे पेट्राेल पंप ते काेणार्क हाॅस्पिटल दरम्यान पुलावर लावलेले बंटी पथराेड याच्या वाढदिवसाचे पाेस्टर फाडल्याने साकेगाव येथील मयूर मदन काळे यास मारहाण करण्यात आली. प्रकरण मिटवण्यासाठी काळेकडून ५ लाखांची खंडणी मागण्यात आली. त्यातील २ लाखांची रक्कम पथराेडसह साथीदारांनी घेतली. याप्रकरणी काळे यांच्या फियादीवरून बंटी पथराेडसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पाेलिसांनी एका आरोपीला अटक केली.
बंटी पथरोड याच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडल्याने पथरोड व सहकाऱ्यांनी साकेगाव येथील मयूर काळे याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. पथराेड व सहकाऱ्यांनी पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एमएच.१-५६७६) बऱ्हाटे पेट्राेल पंप ते काेणार्क हाॅस्पिटलपर्यंत अपहरण करून पिस्तूल, चाॅपर व शस्त्रांचा धाक दाखवून ५ लाख रूपये खंडणीची मागणी केली. मागणी मान्य झाल्यावर त्यास सोडले. सागर भाेई याने दाेन लाखांची खंडणी वसूल केली. ही घटना ७ सप्टेंबरला सायंकाळी ६.३० ते ८ सप्टेंबरच्या सकाळी १०.३० वाजेदरम्यान घडली. दरम्यान, उर्वरित पैशांसाठी पुन्हा काळे यांना त्रास देण्यास सुरूवात केली. यानंतर काळे यांनी नितीन काेळी (रा.अंजाळे. ता.यावल), हर्षल पाटील (भुसावळ), गोलू जव्हेरीलाल कोटेचा, सागर भोई (रा.साकेगाव) अाेम आणि बंटी पथराेड या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सागर भाेई याला अटक करून न्यायालयात हजर केल्यावर १४ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली. तपास सहायक पाेलिस निरीक्षक अमाेल पवार करत अाहे.