जळगाव, प्रतिनिधी । दारिद्र्याला कंटाळून कुटुंब प्रमुखांसह चौघांनी विष प्राशन केल्याची घटना भुसावळ येथे मागील महिन्यात घडली होती. या घटनेत तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. दुर्देवाने कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला. या खंत व गंभीर इतर दोघांना वाचवायचे या जिद्दीसह वैद्यकीय पथकाने उपचार सुरू ठेवले. अन् कुटुंबप्रमुखाच्या पत्नीसह मुलीला तसेच मुलालादेखील मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून आणले. ही कौतुकास्पद कामगिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने केली आहे.
भुसावळ येथील वांजोळा रोड परिसरात राहणा-या एका परिवाराने आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये परिवारातील मुलगा हा उपचारानंतर बरा झाला होता. मात्र कुटुंबप्रमुख, त्यांची पत्नी व मुलगी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करीत शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू केले. उपचार सुरू असतांना कुटुंबप्रमुख यांचा मृत्यू झाला होता. याची वैद्यकीय पथकाला खंत होती. मात्र कुटुंबप्रमुखाची पत्नी व मुलगी यांना वाचवायचं या जिद्दीने त्यांनी पुढील उपचार सुरू ठेवले.
त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तब्बल तीन आठवड्यानंतर कुटुंबप्रमुखाची पत्नी आणि मुलगी हे दोघेही पूर्णपणे बरे झाले. अतिदक्षता विभागातून जनरल वार्डात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सोमवारी दि.३ जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत त्यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी औषध वैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक प्रा. डॉ. विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
भुसावळ येथील अत्यवस्थ कुटुंबावर उपचार करण्याकामी छातीविकार विभागाचे डॉ. स्वप्निल चौधरी, डॉ. भूषण पाटील, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. गजानन परखड, डॉ.प्रसाद खैरनार, डॉ. ऋषिकेश येऊळ, डॉ. सुबोध महल्ले, डॉ.विशाल आंबेकर, डॉ.संदीप बोरसे, डॉ. अमित भंगाळे, डॉ.नेहा चौधरी यांच्यासह १४ नंबर आयसीयू इन्चार्ज माया सोळंकी, १३ नंबर कक्ष परिचारिका इन्चार्ज यशोदा जोशी यांनी परिश्रम घेतले.