जळगाव ः प्रतिनिधी
तीन दिवसांचा प्रति लॉकडाऊन निमित्त लावण्यात आलेले विशेष निर्बंध आज संपुष्टात आले.त्यापाठोपाठ आगामी १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले आहेत. त्यात सिनेमागृह, मॉल, बगीचे, नाट्यगृह, प्रेक्षकगृहे आदी ठिकाणे सुरू करण्यावर बंदी कायम ठेवली आहे. त्याचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती १० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे.
या काळात रात्री १० ते सकाळी ७ वाजेदरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. सर्व नॉन इसेन्शियल दुकाने मात्र, सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच सुरू ठेवता येणार आहेत. हॉटेल, खानावळी, परमिट रूम, बार सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू असतील. होम डिलिव्हरी रात्री १० वाजेपर्यंत देता येईल. या ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची अट लागू असेल.
यांना सशर्त परवानगी
भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने, एका आड एक, बाजार समित्या नियम पालन करून, हॉटेल बार बैठक व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने, शिक्षणाची सुविधा ऑनलाईनद्वारे, वाचनालये, अभ्यासिका ५० टक्के क्षमेतेने, धार्मिक स्थळे ५ लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत केवळ पूजा-अर्चा करण्यासाठी. अंत्यविधीला २० लोकांनाच उपस्थित राहता येईल. लग्नसमारंभाला २० लोकांची उपस्थिती, वैधानिक सभांना ५० लोकांच्या मर्यादेत परवानगी,निदर्शने, मोर्चे, रॅलींना बंदी मात्र, ५ जणांच्या उपस्थितीत पोलिस परवानगीने निवेदन देता येईल. खासगी आस्थापना, कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. शासकीय व निमशासकीय कार्यालये आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा वगळून ५० टक्के कर्मचार्यांची उपस्थितीबाबत प्रमुखाने निर्णय घ्यायचा आहे.
शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंद
सर्व शासकीय कार्यालयांत कामानिमित्त येणार्या अभ्यांगतांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय अभ्यंगतांना प्रवेश असणार नाही.ज्यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात आले असेल त्यांना विभागाच्या प्रमुखांच्या पासनेच प्रवेश दिला जाईल.
संचारबंदीचा नियम तोडल्यास हजार रुपये दंड
जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रतिव्यक्ती १ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येईल.
हे राहणार बंद... सर्व आठवडे बाजार, सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, खासगी क्लासेस, सिनेमागृहे, नाट्यगृहे, बगिचे, क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, जिम, व्यायामशाळा, खेळांची मैदाने, स्वीमिंग टँक, यात्रा, दिंड्या, उरुस, धार्मिक कार्यक्रम, लॉन्स, मंगल कार्यालये.