जळगाव ः प्रतिनिधी
मोकाट कुत्र्यांची समस्या आता डोईजड झाली आहे. लहान मुले सातत्याने लक्ष्य होत असून, आणखी किती दिवस लचके तुटणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांनाच कुत्र्यांची पिले भेट देऊन निषेध नोंदवला.
शहरात गेल्या दहा वर्षांत कुत्र्यांची संख्या दुप्पट झाली . ७ वर्षे सतत प्रयत्न केल्यानंतर वर्षभरापुर्वी कुठे कुत्रे निर्बीजीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. त्यात कोरोनाचा कहर वाढला आणि ते काम बंद पडले. दरम्यानच्या काळात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. घरातून एकटे बाहेर पडणे म्हणजे धोका पत्करणे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत १९ जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यात लहान मुले लक्ष्य होत असल्याने आता लहान मुलांना एकटे सोडणे अवघड झाले आहे. परिस्थिती दररोज बिकट होत असताना मनपा प्रशासन मात्र निश्चिंत असल्याने नगरसेवकांच्या संतापाचा बांध मंगळवारी फुटला व प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगण्याची वेळ आली आहे.
माणसांची किंमत केव्हा कळेल
चार महिन्यांपूर्वी रेल्वेच्या कामगाराच्या आठ महिन्याच्या मुलाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तीन दिवसांपासून दररोज लहान मुलांचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. कुत्र्यांच्या भीतीने रात्री घराबाहेर पडणे आता अवघड झाले आहे. महापालिका सर्व काही कळत असतानाही निश्चिंत असल्याने माणसांपेक्षा कुत्र्यांची काळजी अधिक आहे का? माणसांची किंमत केव्हा कळेल असा सवाल दारकुंडे व नाईक यांनी उपस्थित केला.
सभा सुरू होण्यापूर्वी घडला प्रकार
कुत्र्यांची समस्या सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने भाजप नगरसेवक नवनाथ दारकुंडे व शिवसेनेचे प्रशांत नाईक यांच्यासह किशोर बाविस्कर यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. मोकाट कुत्र्यांनी तीन दिवसांत १९ जणांना चावा घेतला आहे, असे असतानाही पालिका प्रशासन कायद्याच्या आड लपत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला. प्रशासन ऍनिमल वेल्फेअर बोर्डाकडे पाठपुरावा करीत आहे तर कुठे आहे कागदपत्र अशी विचारणा केली. प्रशासन जनतेच्या समस्यांप्रती गंभीर नसल्याने नगरसेवकांनी कुत्र्यांची पिले आयुक्तांना भेट देत निषेध नोंदवला. स्थायीची सभा सुरू होण्यापूर्वी घडलेल्या या प्रकाराने सर्व अवाक झाले.
जळगावात तीन दिवसांत १९ जणांचे लचके तोडले
महापालिकेच्या सभागृहात थेट आयुक्तांनाच कुत्रे भेट दिली जात असताना आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त पवन पाटील हे काहीही बोलले नाही परंतु त्यांना हसू आवरले गेले नाही. त्यामुळे एकीकडे आयुक्तांचा पाणउतारा होत असताना दुसरीकडे आपलेच अधिकारी हसत असल्याने आयुक्त कुलकर्णी भडकले. तुमच्या नाकर्तेपणामुळे मला तीव्र रोषाला सामोरे जावे लागते. प्रश्न गांभीर्याने घ्या, अशा शब्दात त्यांनी सहायक आयुक्तांना खडे बोल सुनावले.
भाजपला घरचा आहेर
शिवसेना विरोधी पक्ष असल्याने ते जनतेच्या प्रश्नावर सत्ताधार्यांची कोंडी करणे समजू शकते; महिनाभरापूर्वी दिलेल्या निवेदनानंतरही काहीही उपाययोजना होत नसल्याने भाजपचे नगरसेवक दारकुंडे यांनीही या आंदोलनात उडी घेतली. अनेकदा आपल्याच पक्षाच्या व नेत्यांच्या विरोधात भूमिका घेणार्या दारकुंडे यांनी आयुक्तांना कुत्र्यांची पिले भेट देऊन भाजपला घरचा आहेर दिल्याच्या प्रतिक्रिया शहरातून व्यक्त होत आहेत.