मुंबई : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे बिगुल (UP assembly-election-2022)वाजल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच
उत्तरप्रदेशातील योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (swami-prasad-morya) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे भाजप (BJP)अॅक्शन मोडमध्ये आला आहे.
मौर्य यांच्या पाठोपाठ भाजपचे तिंदवारी येथील आमदार बृजेश प्रजापती, बिल्होर येथील आमदार भगवती सागर आणि तिलहर येथील आमदार रोशन लाल वर्मा यांनी सुद्धा भाजपला सोडचिट्ठी दिली. यापार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाला मोठा झटका देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
उत्तर प्रदेशातील राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः गृहमंत्री अमित शहा लक्ष घालून आहे. समाजवादी पक्षाला मोठा धक्का देण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्षातील एक मोठा चेहरा लवकरच आपल्या गटात सामील करण्यासाठी भाजपने हालचाली सुरु केल्या आहेत.
भाजपने नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. त्यासोबतच इतरही सहयोगिंना रोखण्याचे प्रयत्न पक्षाकडून करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने मित्र पक्षांसोबत संपर्क सुरु केला असून त्यांना योग्य त्या जागा देण्याचे आश्वासन दिले आहे.
मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे १३ आमदार पक्ष सोडणार असल्याच्या वृत्ताने भाजपच्या गोटात खळबळ उडाली.
कॅबिनेट मंत्री दारा सिंह चौहान, राज्यमंत्री धरम सिंह सैनि, आमदार ममतेश शाक्य, विनय शाक्य, धर्मेंद्र शाक्य, एमएलसी देवेंद्र प्रताप सिंह हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
या राजकीय घडामोडीनंतर भाजप सतर्क झाली असून यासंदर्भात पक्षाच्या कोअर कमिटीची 10 तास बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तरप्रदेशातील सहा क्षेत्रांचा क्षेत्रनिहाय आढावा घेतला. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात आल्याची माहिती आहे.