जळगाव : प्रतिनिधी
महापौर व उपमहापौर पदासाठी राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. बुधवारी भाजपच्या पदाधिकार्यांनी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी ८ असे १६ अर्ज घेतले. पक्षात गटबाजी नसल्याचा दावा करणार्या पदाधिकार्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज घेतल्याने पक्षांतर्गत तर्कवितर्क लावले जात आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अडीच वर्षे पूर्ण झाले आहेत. पहिल्या टर्ममधील दुसर्या महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे १८ मार्च रोजी नवीन महापौरांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी ९ मार्चपासून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, गटनेते भगत बालाणी व स्वीकृत नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी काल नगरसचिवांकडून दोन्ही प्रमुख पदांसाठी प्रत्येकी आठ अर्ज घेतले. यावेळी महानगराध्यक्ष व गटनेत्यांनी सुरात सूर मिसळत पक्षात गटबाजी नसून, सर्व नगरसेवक एकसंघ असल्याचा दावा केला. कुरघोडीचे कोणतेही राजकारण सुरू नसून, चर्चांना तथ्य नसल्याचे सांगितले. नेतृत्वाकडून जे नाव निश्चित होईल त्यांच्या पाठीशी सर्व एकदिलाने उभे राहू असा दावा केला.
महाजनांसोबत बैठकीनंतर निर्णय विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने माजी मंत्री गिरीश महाजन हे मुंबईला आहेत. तर जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने उपचारासाठी मुंबईला गेले आहेत. येत्या तीन दिवसांत शहरात जनता कर्फ्यू आहे. त्यामुळे सोमवारी माजी मंत्री गिरीश महाजन,आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची बैठक होऊन नावावर चर्चा केली जाणार आहे. सोमवारी यासंदर्भात जळगावात बैठक होऊ शकते.
जागा एक, इच्छुक अनेक
महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपच्या नेत्यांनी गेल्या अडीच वर्षांत अनेकांना पदे देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुकांनी नेत्यांना आश्वासनांची आठवण करून देण्यास सुरुवात केली आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक आहेत. त्यामुळे निर्णय घेताना नेत्यांचा कस लागणार आहे. दरम्यान महापौरपदासाठी प्रतिभाताई कापसे यांचे नाव आघाडीवर असून, उमहापौरपदासाठी अनुसूचित जाती संवर्गातील उमेदवाराला संधी देण्याचे ठरल्यास चेतन सनकत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. तसेच अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारास संधी दिल्यास धीरज सोनवणेंचे नाव पुढे येऊ शकते. महिला महापौर असल्याने उपमहापौरपदासाठी तरुण चेहर्याचा विचार केला जाईल असेही पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने सध्या हालचालींना वेग आला आहे.