भरधाव डंपरने दुचाकीला उडविले

0
21

जळगाव : प्रतिनिधी
वाळू वाहतूक करणार्‍या तसेच भरधाव वेगाने धावणार्‍या डंपरने आज सकाळी आणखी एक बळी घेतला. शहरातील इच्छादेवी चौकापुढे राष्ट्रीय महामार्गावर सिध्दी विनायक हॉस्पिटलजवळ झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेला एक व्यक्ती जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेसंदर्भात प्राप्त माहिती अशी की, सिंधी कॉलनी रोडवरील आंबेडकर गृहातील रहिवासी सिध्दार्थ त्र्यंबक मोरे (वय ५५)हे रेमंड मध्ये प्रॉडक्शन विभागात नोकरीला आहेत. ते रेमंडमधील सहकार्‍यासोबत दररोज कामावर जात होते. नित्याप्रमाणे आज सकाळी त्यांना अक्षय विजय पाटील (वय ३०, मुळ रा. वढोदा, ता. चोपडा ह.मु. शिवम नगर जळगाव) याने सिंधी कॉलनीतील भाजी मार्केटपासून दुचाकीवर घेतले. रेमंड कंपनीत जात असतांना आज सकाळी इच्छादेवी चौकापुढे असणार्‍या सिध्दी विनायक हॉस्पिटलजवळ अक्षय पाटील चालवत असलेल्या दुचाकीला (क्र .एम.एच. १९ सीसी ६७७७) डंपरने (एम.पी. ०४ जीए ३४९२) मागून उडविले. या भीषण अपघातात मागे बसलेले सिध्दार्थ त्र्यंबक मोरे हे जागीच ठार झाले. तर चालक अक्षय पाटील गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मोरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविला आहे. दरम्यान गंभीर जखमी अक्षय पाटील यास उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
वाळू वाहतूक करणार्‍या तसेच भरधाव वेगाने धावणार्‍या डंपर्सने आजपर्यंत शहरात अनेक बळी घेतले आहे. या प्रकरणी नागरिकांनी सातत्याने संतप्त भावना व्यक्त करून देखील भरधाव वेगाने धावणार्‍या डंपर्सविरूध्द कठोर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here