जामनेर ः प्रतिनिधी
आमदार गिरीश महाजन यांच्यासह इतर अनेकांनी बीएचआरच्या मालमत्ता अत्यंत कवडीमोल भावात घेऊन ठेवीदारांचे नुकसान केले. ठेवीदारांनी साथ दिल्यास व ते जामनेरात आल्यास बीएचआरच्या मालमत्ता घेणार्यांच्या घरासमोर २६ जानेवारी रोजी मोर्चा काढून घंटानाद करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ललवाणींनी गिरीश महाजन व साधना महाजन यांच्यावर आरोप केले मात्र एकही पुरावा दिला नाही.
आमदार गिरीश महाजनांचा जामनेर शिक्षण संस्थेच्या मालमत्तांवरही पूर्वीपासूनच डोळा आहे. शासनाच्या विविध प्रकारच्या अधिकृत परवानगी न घेता बीओटी मार्केटमधील गाळे अव्वाच्या सव्वा भावात विक्री करून जवळपास २०० कोटी रूपये कमवले. शेतकी संघाच्या व्यापारी गाळ्यांबाबतही हेच सुरु आहे. पळासखेड्याजवळ त्यांनी आत्ता मालमत्ता खरेदी केली आहे. भन्साळी यांची १ कोटी ४७ लाखाची जमीन १ कोटी ५७ लाखात घेतली.ती इतक्या कमी भावात कशी घेतली? जामनेर नगरपालिकेत नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या कार्यकाळात ४१ टक्क्यापेक्षा जास्त दराने टेंडर मंजूर करण्यात आलेे. गैरव्यवहारांबाबत कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु असून लवकरच न्यायालयात जाणार आहे.बीएचआरच्या माध्यमातून आज जवळपास १ हजार कोटींची कमाई केली आहे. आमदार महाजन यांनी विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करून राजकीय संघटन वाढवले. तत्कालीन पोलिस निरीक्षक नजीर शेख यांचा वापर करून गुन्हे व तडजोड करून घेण्याची धमकी दिली. जीएम हॉस्पिटलसाठी सामाजिक संस्थांकडून निधी गोळा केला तसेच नावही बदलले, राज्यातील आरोग्य शिबिरासाठीही पैसा गोळा केला. तसेच प्रा. उत्तम पवार व त्यांच्या परिवाराला त्रास दिल्यामुळे ते जळगाव रहायला गेले, असे आरोपीही ललवाणी यांनी केले. आमच्यावर दहा वर्षापूर्वीचे गुन्हे दाखल केले, तर तुमच्यावर ३ वर्षानंतर गुन्हा दाखल झाला तर त्यात गैरकाय? असेही ते म्हणाले. ललवाणींनी त्यांच्या जवळील १ सीडी, पेन ड्राइव्ह दाखवला. मात्र त्यात काय आहे? याविषयी सांगितले नाही.हा ट्रेलर आहे,पिक्चर बाकी आहे असे ते म्हणाले.