जळगाव ः प्रतिनिधी
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत शहरातील विविध भागांत बालवाड्या चालवल्या जातात. मात्र, कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून बालवाड्यांतील कामकाज थांबवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मिळणारे मानधनही संबंधित शिक्षिका व मदतनिसांना मिळालेले नाही.त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शिक्षिका व मदतनिसांना महापालिका प्रशासनाने न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षिका व मदतनिसांनी महापौर जयश्रीताई महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालवल्या जाणार्या बालवाड्या ‘कोविड-१९’च्या संसर्गामुळे जवळपास वर्षभरापासून बंदावस्थेत आहेत. त्यामुळे शिक्षिका, मदतनिसांना मानधन मिळू शकलेले नाही. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडूनही पत्रव्यवहार अथवा सूचना प्राप्त होऊ शकलेली नाही. त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही कर्मचार्याचे वेतन अथवा मानधन शासनाकडून थांबवण्यात आले, असे ऐकिवात नाही. मग आमच्याच बाबतीत वेगळा न्याय कसा? आमचेच मानधन का थांबवले? आम्ही पदाच्या अनुषंगाने कोणतेही काम करण्यास तयार आहोत. त्यामुळे महापालिका प्रशासन, महिला-बालकल्याण विभागाचे अधिकारी तसेच महापौरांनी याकडे लक्ष देऊन शिक्षिका, मदतनिसांना न्याय द्यावा अशी मागणी महापौरांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महापौर जयश्री महाजन यांची शहरातील बालवाड्यांच्या शिक्षिका आणि मदतनीस यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर प्रमुख मागण्यांचे निवेदन महापौर यांच्याकडे दिले.