जळगाव : प्रतिनिधी
स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे १ ते ३ जानेवारी असे तीन दिवस येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून व आसन क्षमतेच्या ५० टक्के रसिकांना महोत्सवास उपस्थित राहता येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एकोणिसाव्या बालगंधर्व महोत्सवाची सुरुवात १ जानेवारी २०२१ रोजी होणार असून प्रथम सत्रात ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम असलेल्या तरुण उदयोन्मुख आणि आश्वासक अशी कलावंत शरयू दारेच्या गायनाने होणार आहे, द्वितीय सत्र वेणूवादनाने अर्थात बासरी वादनाने होईल. द्वितीय सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत अश्विन श्रीनिवासन आपली कला सादर करणार असून त्यांना तबल्याची साथ ओजस अधिया तर गिटारची साथ संजोय दास देणार आहे.
२ जानेवारीला संगीत रिसर्च अकादमीचे गुरु ओमकार दादरकर यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल.त्यात तबला संगत पुण्याचे चारुदत्त फडके तर संवादिनी संगत पुण्याचे मिलींद कुलकर्णी करणार आहे.यानंतर प्रख्यात नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनीस व सहकारी हे कथ्थक नृत्याच्या माध्यमातून बॉलिवूड फूट प्रिंट्स हा नृत्याविष्कार सादर करणार आहेत. ३ जानेवारीला प्रथम सत्रात ओरिसा येथील गोटीपूवा या लोकनृत्याचे सादरीकरण होईल. भुवनेश्वर येथील नृत्यांगना सुश्री मोहंती यांचे ओडिसा नृत्य होईल.महोत्सवाचा समारोप हा १९१० ते १९६० या काळातील गाजलेल्या गाण्यांचा ‘आम्ही दुनियेचे राजे’ संगीत आणि नाट्य यांचा संगम घडवून आणणारा कार्यक्रम आहे. कार्यक्रमात संगीत दिग्दर्शक देवेंद्र भोमे जुनी गाणी नव्या पद्धतीने संगीतबद्ध करून सादर करणार आहेत.पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे सचिव अरविंद देशपांडे, उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, शरदचंद्र छापेकर आदी उपस्थित होते.