रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडू आणि चंदीगड दरम्यानचा गुवाहाटी येथे सुरू असलेला सामना इंद्रजीत आणि अपराजीत बाबा ह्या जुळ्या भावंडांनी स्पेशल बनवला आहे. ह्या दोघांनी तामिळनाडूच्या पहिल्या डावात शतकं झळकावली आणि एकाच डावात शतकं झळकावणारी ही जुळ्या भावांची केवळ तिसरीच जोडी ठरली.
बाबा भावंडांच्या आधी आॕस्ट्रेलियाचे स्टीव्ह आणि मार्क वाॅ हे आणि न्यूझीलंडचे जेम्स आणि हमीश मार्शल ह्या जुळ्या भावांनी असा पराक्रम केलेला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मात्र पहिल्यांदाच जुळ्या भावांनी एकाच डावात शतकं झळकावली आहेत.
इंद्रजीत हा 127 धावा काढून बाद झाला तर अपराजीत हा दुसऱ्या दिवशी उपहारावेळी 144 धावावर नाबाद आहे. 8 जुलै 1994 अशी या दोन्ही भावांची जन्मतारीख आहे.
मार्क आणि स्टिव्ह वाॅ ह्या भावंडांनी तब्बल 9 वेळा एकाच डावात शतकं केली. त्यापैकी दोन वेळा त्यांनी कसोटी सामन्यात अशी कामगिरी केली आहे. योगायोग म्हणजे बरोबर 12 वर्षांनंतर प्रथमश्रेणी क्रिकेट मध्ये अशी शतकं लागली आहेत. ह्याच्या आधी 25 फेब्रुवारी 2010 रोजी न्यूझीलंड मधील नाॅदर्न डिस्ट्रिक्ट संघासाठी जेम्स मार्शलने 178 आणि हमीश मार्शल ने 170 धावांची खेळी केली होती त्यानंतर आता बाबा बंधूंनी अशी कामगिरी केली आहे.