‘बर्ड फ्लू’चा शिरकाव रोखण्यासाठी मार्केटमध्ये मांस तपासा : जिल्हाधिकारी

0
36

जळगाव : प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मचे सॅनिटायझेशन करून काळजी घ्यावी. मृत पक्ष्यांबाबत पशुसंवर्धन विभागाला कळवावे. त्याचप्रमाणे नगरपालिका क्षेत्रातील मोठ्या मार्केटमध्ये विक्री होणारे मांस तपासण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
देशातील काही राज्यांबरोबरच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा घेतला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तर तालुका आरोग्यधिकारी, नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते. बर्ड फ्लूचा संभाव्य प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोल्ट्री व्यावसायिकांनी दक्षता म्हणून आपल्या पोल्ट्री फार्मचे सॅनिटायझेशन करून घ्यावे. जिल्ह्यातील कुठल्याही पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांची मर दिसून आल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे, असे पक्षी कुठेही विक्री करू नये शिवाय हे पक्षी इतर पक्ष्यांमध्ये मिसळणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर याठिकाणी काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. नगरपालिका क्षेत्रात जेथे मोठे मार्केट आहे तेथील विक्री होणारे मांस नगरपालिकेच्या पथकाने तपासण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या.
जिल्ह्यात सध्या अंदाजे २२६ पोल्ट्री फार्म आहेत. या व्यावसायिकांशी पशुसंवर्धन विभागाने समन्वय साधून त्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभाग आवश्यक ती दक्षता घेत असून, यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आल्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन श्याम पाटील यांनी सांगितले. तसेच बर्ड फ्लूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, तूर्त जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका नसल्याचे ए.डी. पाटील यांनी बैठकीत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here