फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी
शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची फैजपूर शहरासह परिसरात गल्लोगल्ली सर्रास विक्री होत असून यास स्थानिक अधिकार्यांचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे.
दि.९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन अधिकार्यांनी टाकलेल्या धाडीत मिल्लत नगर परिसरातील शाळेच्या मागे तब्बल सात लाख ६८ हजार ७६८ रुपयांचा विमल गुटखा व व्ही-१ सुगंधित तंबाखू पाकिटे मिळून आले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून संशयित शेख मोहसीन शेख युनूस उर्फ कल्लू हा फरार असल्याचे तपास अधिकारी पीएसआय रोहिदास ठोंबरे यांनी सांगितले. फैजपूर शहरात गुटख्यावर झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. याआधी अनेक वेळा शहरात गुटखा पकडला गेला. मात्र, ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ याप्रमाणे प्रकरण दाबले गेले. यावेळी जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अरविंद कांडेलकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा सापडल्याने स्थानिक पोलिस अधिकार्यांवर टिका केली जात आहे. फैजपूर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची पाळेमुळे सर्व स्थानिक पोलिसांना माहिती असूनही अधिकारी सक्षम कारवाई करत नाही. त्याची वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेतल्यासच कारवाई होते, अशी अवस्था आहे.
या लाखो रुपये किमतीच्या गुटख्याप्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर जळगाव यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यात आरोपीला अटक करण्याचे पोलिसांसमोर खरे आव्हान आहे.