जळगाव ः प्रतिनिधी
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल व मे २०२१ मध्ये दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा दोन महिने उशिराने होत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी या दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. दहावीच्या लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. तर बारावीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत होईल.
दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी परीक्षा १२ ते २८ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे तर बारावीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ५ ते २२ एप्रिल या दरम्यान घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळातर्फे येत्या दोन दिवसांत सर्व परीक्षा केंद्र, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या जाणार आहे. त्यानुसार पुढील प्रक्रिया होईल.