जळगाव ः प्रतिनिधी
येथील नॉलेज सिटीमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु असतांनाच एका माजी नगरसेवकासह चौघांनी कॉलेजच्या आवारातच हैदोस माजवत प्राचार्य डॉ. विलास पाटील यांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती.दरम्यान, सदर प्रकरणी प्राचार्य डॉ.पाटील यांच्या जबाबावरुन धरणगाव पोलीसात माजी नगरसेवकासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,याच कॉलेजमधील दुसर्या प्रकरणात शोभा नायर यांच्या फिर्यादीवरुन विनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील खान्देश बहुउद्देशीय संस्था संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास मुलचंद पाटील हे जळगाव येथील दिपीका हॉस्पीटलमध्ये उपचार घेत असतांना त्यांच्याकडून जबाब नोंदविण्यात आला.
जबाबात ते म्हणतात की, दि.१७ फेब्रुवारी रोजी मला कॉलेजमध्ये नोकरीच्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी माझा मुलगा अनिरुध्द याने चारचाकी गाडीने नेहमीप्रमाणे अभियांत्रिकी विद्यालयात सोडले. यावेळी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु होत्या. ११.३० वाजेच्या सुमारास सिक्युरीटी गार्ड व्ही.एम. मांडोळे यांचा फोन माझ्या कॅबिनमध्ये आला.ते म्हणाले की, माजी नगरसेवक नितीन नन्नवरे, आर.व्ही.पाटील, विलास डी. नायर, सौरभ नाईक यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती येथे येवून सांग आहेत की तुम्ही येथे थांबू नका, तुम्हाला येथून काढण्यात आले आहे यावर डॉ.पाटील यांनी त्यास सांगितले.
याबाबत संबंधित व्यक्तींनी मांडोळे यांना काय त्रास दिला आहे याबाबत अर्ज दिला. त्यावर डॉ. पाटील यांनी महाविद्यालयाचे कव्हरींग लेटर जोडून पाळधी पोलीसात गेले परंतु तेथे अधिकारी नसल्याने हे दोघे जण पुन्हा महाविद्यालयात परतले. त्यावेळी डॉ. पाटील यांनी कॅबिन उघडण्यास गेले असता नितीन नन्नवरे, आर.व्ही. पाटील, विलास डी. नायर, सौरभ नाईक यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती यांनी कॅबिनच्या बाहेरील पोर्चमध्ये डॉ.पाटील यांना अर्वाच्य शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. यात डॉ.पाटील जमिनीवर पडले त्यात त्यांचा चष्मा फुटला तसेच नितीन नन्नवरे यांनी धारदार शस्त्राने डॉ.पाटील यांच्या डाव्या हाताच्या कोपरावर वार केला. या घटनेत डॉ. पाटील यांना हाताला गंभीर दुखापत झाली तसेच छाती व पोटावर मुक्कामार लागला आहे. मारहाणीत डॉ.पाटील यांची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैनही गहाळ झाली आहे. या घटनेत डॉ. पाटील यांनी आरडाओरड केली असता महाविद्यालयातील हर्षल पाटील, जयंत जाधव, अर्जित पवार, हर्षल राणे आदींनी डॉ.पाटील यांना त्यांच्या तावडीतून सोडविले. तसेच हर्षल पाटील यांनी गेटपर्यंत टू-व्हिलरवर आणले व त्यानंतर रोहीत पाटील यांनी फोर-व्हिलरने जळगाव येथे उपचारार्थ दिपीका हॉस्पीटल येथे दाखल केले. असा जबाब डॉ.विलास मुलचंद पाटील यांनी जिल्हा पोलीस स्थानकाचे नेमणुकीवर असलेले पोहेकॉ तुषार जावरे यांच्याकडे दिला. दरम्यान, या जबाबावरुन धरणगाव पोलीसात भादंवि कलम १४३, १४७, ३२३ प्रमाणे नितीन नन्नवरे, आर.व्ही. पाटील, विलास डी. नायर, सौरभ नाईक यांच्यासह दोन अनोळखी व्यक्ती आदींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोहेकॉ नसिन तडवी हे करीत आहेत.
सहा जणांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा
दरम्यान, याच महविद्यालयातील दुसर्या एका प्रकरणात शोभा विलास नायर यांच्या फिर्यादीवरुन सहा जणांविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शोभा नायर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या नॉलेज सिटी महाविद्यालयाच्या कार्यालयात कामकाजादरम्यान व्यस्त असतांना डॉ.विलास पाटील यांनी येत त्यांच्याशी वाद घातला. या वादात त्यांनी त्यांच्यासह असलेल्या सचिन पाटील, रोहित पाटील, हरजित पवार, हर्षल राणे, जयंत जाधव आदींनी अर्वाच्च शिवीगाळ करत धमकावले. विलास पाटील यांनी हात पकडत हुज्जत घातली. या दरम्यान नायर यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गळ्यातील दिड तोळे वजनाचे मंगळसुत्र गहाळ झाले. याबाबत धरणगाव पोलीसात विलास पाटील यांच्यासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अरुण निकुंभ करीत आहेत.