जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.किसन पाटील (वय ६७) यांचे काल मंगळवारी (२ मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ.किसन पाटील यांनी विविध पदांवर काम केले. मू. जे. महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता, रावेर येथील सरदारजी जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी कलाशिक्षक, तसेच एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालयाचे प्राचार्य होते.
ते मराठी साहित्य आणि भाषा, समीक्षेतील अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. चित्रकला, कलेचा इतिहास, सौंदर्यशास्त्र, लोकसाहित्य, लोककला आणि संत साहित्याचे अभ्यासक, जनसंवाद माध्यमे आणि पत्रकारिता क्षेत्रातील मार्गदर्शकही होते.त्यांनी विविध ग्रंथांना प्रस्तावना, अनेक भाषणे, व्याख्याने, अध्यक्षीय भाषणे, आकाशवाणी-दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग घेतला होता.त्यांच्या निधनाने साहित्य व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.