जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटानंतर नुकतेच महाविद्यालय सुरु झाले आहेत. येथील नॉलेज सिटीमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु असतांनाच एका माजी नगरसेवकासह चौघांनी कॉलेजच्या आवारातच हैदोस माजवत प्राचार्य डॉ. विलास पाटील यांना बेदम मारहाण करत दहशत पसविण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल घडली. या घटनेने जिल्ह्यातील शैक्षणिक जगत हादरले असून विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्ग दहशतीखाली असल्याचे चित्र उभे राहिले आहे. दरम्यान, या गुंड प्रवृत्तीविरुध्द शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील खान्देश बहुउद्देशीय संस्था संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी नार्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी या महाविद्यालयात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक व मौखिक परिक्षा सुरु आहेत. काल सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक नितीन नन्नवरे, रतीलाल वना पाटील, विलास दत्तात्रय नायर, सौरभ विलास नाईक यांच्यासह चार ते पाच जणांनी महाविद्यालयाच्या गेटवर येत सुरक्षा रक्षकाच्या कॅबीनमध्ये घुसत सुरक्षारक्षक मांडोळे यांना कॅबीनमधून काढत तुझी आम्ही हाकालपट्टी करीत आहोत, असे धमकावत त्याला धमकावण्यास सुरुवात केली व त्याला तेथून हाकलून दिले. सदर प्रकार सुरक्षारक्षक मांडोळे यांनी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांच्या कानी घातला. त्यावर प्राचार्यांनी मांडोळे यांना तुम्ही तुमची तक्रार लेखी स्वरुपात द्यावी असे सांगितले. त्यानंतर मांडोळे यांनी त्यांची तक्रार लेखी स्वरुपात प्राचार्य डॉ. पाटील यांच्याकडे दिली. यासंदर्भात कारवाईकामी प्राचार्यांसह सुरक्षारक्षक मांडाळे हे पाळधी पोलीस स्थानकात गेले असता त्याठिकाणी त्यांना संबंधित अधिकारी राऊंडवर गेले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळ पाहून डॉ.पाटील व मांडोळे हे पुन्हा महाविद्यालयात परतले. सुमारे १.३० वाजेच्या सुमारास दोघेही महाविद्यालयात पोहोचले असता महाविद्यालयात धुडगूस घालीत असणार्या ८ ते १० जणांनी डॉ.पाटील यांना घेरले व थेट मारहाण करत त्यांना त्यांच्या दालनातून फरफटत बाहेर काढले. यावेळी डॉ.विलास पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नितीन नन्नवरे यांनी त्यांच्याजवळ असलेल्या चॉपरने डॉ. पाटील यांच्यावर वार केला असता चॉपरचा वार त्यांच्या हाताला लागला. या मारहाणीत डॉ. विलास पाटील हे जबर जखमी झाले. तसेच त्यांच्या गळ्यात असलेली १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैनही बेपत्ता झाली. डॉ. पाटील यांना मारहाण सुरु असतांना महाविद्यालयातील काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी धाव घेत त्यांची कशीबशी सुटका केली. यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रात्री उशिरा डॉ. विलास पाटील यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले असून याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे खात्रीशिर वृत्त आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन
घटनेनंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन दिले. निवेदनाम म्हटले आहे की, रतिलाल वना पाटील, विलास दत्तात्रय नायर, नितीन रामचंद्र नन्नवरे, सौरभ विलास नाईक व तीन ते चार शस्त्रास्त्रधारी लोकांनी प्राचार्य डॉ. विलास मुलचंद पाटील यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत उद्यापासून कामावर येऊ नका, असे म्हणत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. सदरच्या प्रकरणाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व कर्मचार्यांच्या मनामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून भितीचे वातावरण पसरले आहे. संबंधित व्यक्तींना तत्काळ अटक करून महाविद्यालयात पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर सचिन पाटील, जयंत जाधव, प्रदीप पाटील, पी. डी. शिंपी, डी.बी.गरुड, एच.एस.राणे, एच.व्ही.पवार, जे.व्ही.निकम, एच.वाय. पाटील, पी.एस. चिरमाडे, आर.सी.पाटील, आय.एस.राणे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
