जळगाव, : जळगावकर नागरिकांची रस्त्यांसंदर्भात होणारी गैरसोय आता टप्प्या-टप्प्याने दूर करणे सुरू झालेले आहे. शहरात आता विविध रस्त्यांच्या कामांना सुरूवात ही झालेली आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी गुरुवार, दि. 20 जानेवारी 2021 रोजी प्रभाग क्र. 12 मधील विवेकानंदनगर व स्टेट बँक कॉलनी परिसरात भेट देऊन रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी या रस्त्यांच्या कामांत गुणवत्ता जोपासली गेली आहे किंवा नाही हेही जाणून घेतले. त्यानंतर संबंधितांना रस्त्यांच्या कामातील गुणवत्तेत चुका झाल्याचे आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही याप्रसंगी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी दिला.
दरम्यान, प्रभाग क्र. 12 मधील गायत्री नगर येथील रस्त्यांच्या कामाचा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते कुदळ मारून तसेच विधिवत पूजा-अर्चा करून प्रारंभही करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांसमवेत महापौरांनी संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना आश्वासित केले. नगरसेवक श्री.नितीन बरडे, श्री.अनंत ऊर्फ बंटी जोशी, शिवसैनिक सौ.सरिता माळी-कोल्हे आदींसह प्रभागातील नागरिक व महापालिका अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन मंडळ समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून जळगाव शहर महानगरपालिकेसविविध विकासकामांसाठी मंजूर झालेल्या 61 कोटी रुपये निधी अंतर्गत प्रभाग क्र. 12 मधील अनुराग कॉलनी व स्टेट बँक कॉलनी या भागासाठी मंजूर निधीतून रस्त्यांच्या कामाचा गेल्या ऑक्टोबर महिन्यात परिसरातील नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.गुलाबराव पाटील व महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या शुभ हस्ते प्रारंभ करण्यात आला होता. त्या अनुषंगाने परिसरात कार्य प्रगतिपथावर होते. आता या रस्त्यांच्या कामामुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.