प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कारप्राप्त सहावर्षीय शिवांगी काळेचा

0
6

जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार- 2022 प्राप्त कु.शिवांगी प्रसाद काळे (रा. कोल्हेनगर, जळगाव) हिच्या घरी आज मंगळवार, दि.25 जानेवारी 2022 रोजी जाऊन तिचा जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देत यथोचित सत्कार करून तिच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच उत्तम संस्कार व धैर्यशील पालकत्व निभावणार्‍या शिवांगीच्या आई सौ.गुलबक्षी व वडील श्री.प्रसाद काळे यांचेही त्यांनी मनापासून अभिनंदन केले.

कु.शिवांगी काळेचा जन्म 16 एप्रिल 2015 मधील. तिने अवघे सहा वर्षे वय असताना स्वतःमधील धैर्यता दाखविली. त्यात कु.शिवांगीने स्वतः समयसूचकता दाखवत आपली आई व लहान बहिणीला विजेचा धक्का बसण्यापासून बचावत त्यांचे प्राण वाचविले. एवढ्या कमी वयात असताना तिच्यासारखे साहस अन् धैर्य अतिशय कमी प्रमाणात समाजामध्ये पाहावयास मिळते. कु.शिवांगीच्या या बालवीरतेच्या कार्यतत्परतेची प्रधानमंत्री कार्यालयाने दखल घेऊन तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार-2022 देऊन यथोचितपणे गौरविले गेले. महाराष्ट्रातील 29 मुलांना प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्कारांच्या श्रेणीत सहावर्षीय कु.शिवांगीचा समावेश करून जळगावच्या शिरपेचात जणू मानाचा तुरा खोवला आहे. ‘कोरोना’महामारीच्या अनुषंगाने लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर कु.शिंवागीला हा पुरस्कार जळगावचे जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी तिचे वडील श्री.प्रसाद काळे, आई सौ.गुलबक्षी व लहान बहीण कु.इशान्वी याप्रसंगी उपस्थित होते. कु.शिवांगीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धव ठाकरे यांनीही तिचे अभिनंदन केले.

यानंतर आज जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनीही कु.शिवांगीचे तिच्या शहरातील कोल्हेनगरमधील घरी जाऊन पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करून तिच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले. तसेच कु.शिवांगीने या पुरस्काराच्या माध्यमातून जळगावचाही गौरव वाढविला असल्याने समस्त जळगावकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here