भुसावळ : प्रतिनिधी
चाळीस वर्षीय न्यायालयीन लढाईच्या विजयानंतरही भूमी अभिलेख विभागाने प्रदीप पाटील यांच्यावर न्यायासाठी आत्मदहनाची वेळ आणली असून ते येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. दरम्यान, याबाबत चौकशीकामी पाटील यांना जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयात बोलवण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील न्यू एरीया प्लॉटमधील सि.स.नं.३२७७ ही मिळकत प्रदिप पितांबर पाटील यांच्या मालकीची आहे. त्यांच्या शेजारी सिताराम गुलाबचंद अग्रवाल यांची सि.स.नं. ३२८१ ही मिळकत आहे. १९७८ मध्ये सिताराम गुलाबचंद अग्रवाल यांची प्रदीप पाटील यांच्यावर त्यांच्या जागेत अतिक्रमण केल्याचा दावा केला होता.
दरम्यान, दावा सुरु ठेवतच अग्रवाल यांनी सदर मिळकत १९९६ मध्ये विकून टाकली. मात्र या दाव्या कामी प्रदीप पाटील यांना जिल्हा सत्र न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात घिरट्या माराव्याच लागल्या. मा.न्यायालयाने ७/९/२०१८ रोजी कॅडेस्ट्रल सर्व्हेअर म्हणजे टी.आय.एल.आर.ची कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करत मिळकतीची मोजणी करून अहवालासह नकाशा सादर करण्याबाबत आदेशीत केले. यावरुन ११/१२/२०१८ रोजी सिटी सर्व्हेच्या भुसावळ कार्यालयातील कर्मचारी वंदना
महाजन यांनी सदर मिळकतीचे मोजमाप केले. त्यावेळी तक्रारदार पाटील यांनी मोजणी करतांना चुकीच्या पध्दतीने करत असल्याबद्दल हरकत घेतली होती. या हरकतीकडे महाजन यांनी दुर्लक्ष करत सदर अहवाल त्यांच्या मर्जीप्रमाणे वरीष्ठांकडे पाठवला. तसाचातसा अहवाल न्यायालयाकडे गेला.
यावर न्यायालयात कामकाज होत न्यायालयात भूमि अभिलेख विभागातील कर्मचारी वंदना महाजन यांनी साक्ष देतांना चुकीच्या पध्दतीने मोजणी केल्याबद्दल न्यायालयात सांगितल्याने याबाबत न्यायालयाने झालेल्या चुकीच्या पध्दतीने मोजणीबाबत ताशेरे ओढत प्रदीप पाटील यांच्या बाजूने निकाल दिला. याबाबत निकालाच्या परिच्छेद क्र.२६ मध्ये स्पष्ट करण्यात आले. यावरुन प्रदीप पाटील यांनी वंदना महाजन यांच्या चुकीच्या अहवालामुळे मनस्तापासह आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार जिल्हा निरीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडे दिली होती. यात त्यांनी वंदना महाजन यांच्यावर कारवाईबाबत विचारणा केली होती. मात्र आजतागायत या विभागाकडून महाजन यांच्यावर कारवाईसाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेवटी व्यथीत होत पाटील यांनी न्यायासाठी आत्मदहनाचा मार्ग स्विकारला.
दरम्यान, भुसावळ येथील भूमि अभिलेख कार्यालयात असलेला एक कर्मचारी कित्येक वर्षापासून याच कार्यालयात कार्यरत आहे. या महाशयांच्या आदेशावरूनच हे कार्यालय चालते तर वंदना महाजन यांनी जमीन मोजणीबाबतचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसल्याचे समजते. त्यामुळे या परिसरातील कोट्यावधीची संपत्ती नॉन-टेक्नीकल कर्मचार्यांकडून मोजणी होवून नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याची ओरड शहरातून होत आहे.
‘व्यथीत’ होत आत्मदहनाचा निर्णय
४० वर्षे ५ महिने २१ दिवस न्यायालयात न्यायासाठी फिरलो. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला, मात्र भूमि अभिलेख विभागातील कर्मचार्यांनी न्यायालयाची दिशाभूल केली. हे कुठेतरी थांबायला हवं. याबाबत सर्व बाबी जिल्हा भूमि अभिलेख यांच्या निदर्शनास आणल्यावरही त्यांनी कर्मचार्यांचीच बाजू घेतल्याचे दिसून आल्याने शेवटी ‘व्यथीत’ होत मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रदीण पाटील यांनी म्हटले आहे.