जामनेर(प्रतिनिधी):- जिल्हा परिषदेकडून वैयक्तिक लाभार्थ्यांना वाटपासाठी आलेले साहित्य ठेवण्यासाठी आम्हाला इमारतीची आवश्यकता भासत असल्यामुळे आमच्या मालकीची जागा खाली करावी अशा आशयाचे पत्र पंचायत समिती कार्यालयाने पोलीस स्टेशन प्रशासनाला दिलेले आहे.
शहरातील मेन रोडवर असलेल्या इंग्रज राजवटीतील पोलीस स्टेशनची इमारत जीर्ण झाल्यामुळे त्याच जागेच्या बाजूला नविन बांधकाम सुरू असल्यामुळे मागील पाच वर्षांपासून वाकी रोड वरील पंचायत समितीच्या मालकीच्या शिवाजी हॉलमध्ये पोलीस स्टेशनचे भाडे तत्वावर तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून नवीन पोलीस स्टेशनची अद्ययावत इमारत स्वतःच्या जागेमध्ये बांधून तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांच्या हस्ते सदर इमारतीचे उद्घाटन होईल अशी अपेक्षा शहरवासीयांना होती मात्र श्री.वळसे पाटील यांच्या कार्यक्रम दौऱ्यात जामनेरचा समावेश नसल्याने ते होऊ शकले नाही त्यानंतर आज ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उभी आहे .परंतु आता पंचायत समितीने सध्या स्थितीत सुरू असलेल्या पोलिस स्टेशनची जागा खाली करण्यासाठी पत्र दिल्यामुळे पोलीस खात्यातर्फे नविन जागेच्या साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली असून येत्या १-२ दिवसांत उद्घाटना विनाच पोलीस स्टेशनचे नविन ईमारतीत स्थलांतर होऊन नियमितपणे कामकाज सुरू होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
