पुणे : वृत्तसंस्था I राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे आणि धरणे या ठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पुन्हा बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या तालुक्यांतील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, पर्यटनस्थळे, धरणे पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणी शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.