पाच दिवसीय कला महोत्सव रंगणार भाऊंच्या उद्यानात

0
43

जळगाव ः प्रतिनिधी
परिवर्तन जळगावतर्फे पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या जयंती निमित्त ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. भवरलाल भाऊ हे उद्योगपती म्हणून जगात प्रसिद्ध होते पण यासोबतच साहित्य, कला, नाट्य, संगीत, चित्रकला अशा कलांविषयी भाऊंना आस्था होती,प्रेम होते.कला व कलावंतांविषयी जिव्हाळा होता. परिवर्तनतर्फे भाऊंना जयंतीच्या अनुषंगाने विविध कलांतून शब्द, सूर, रंग याद्वारे अनोखी भावांजली अर्पण करण्यात येणार आहे.
दि. १२ ते १६ डिसेंबर या दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अनिस शहा, अनिल कांकरिया, आनंद मलारा, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, नंदलाल गादिया व नारायण बाविस्कर हे भावांजली महोत्सवाचे प्रमुख असून नुकत्याच झालेल्या प्रमुखांच्या बैठकीत पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन निश्‍चित करण्यात आले. महोत्सवाची सुरुवात ‘वेणुत्सव’ने होणार आहे. भवरलाल भाऊंना बासरी खूप आवडायची. त्यानिमित्त त्यांच्या जन्मदिनी खान्देशातील ज्येष्ठ बासरीवादक व देशभर विविध महोत्सव व संगीत कार्यक्रमांमध्ये बासरी वादन करणारे कलावंत संजय सोनवणे व त्यांचे २० शिष्य ‘वेणुत्सव’ हा बासरी वादनाचा कार्यक्रम सादर करणार आहे. दि. १३ डिसेंबर रोजी रविवारी जगप्रसिद्ध संतकवी कबीर यांचा शोध घेणारा संगीतमय कार्यक्रम ‘हंस अकेला’ सादर होणार आहे.
संकल्पना विनोद पाटील यांची तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे . सोमवारी १४ डिसेंबर रोजी चर्चासत्राचे आयोजन करणायात आले आहे. कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने ‘…. आणि सांस्कृतिक जग’ या विषयावर चर्चा होणार आहे. यात सुशील अत्रे, एस एस राणे सर ,अस्मिता गुरव , डॉ.अनिल डोंगरे,यजुवेन्द्र महाजन,मंजुषा भिडे हे वक्ते सहभागी होणार आहेत.हे चर्चासत्र रोटरी भवन मायादेवी नगर येथे दुपारी ४:३० होईल. मंगळवार १५ डिसेंबर रोजी भाऊंच्या उद्यानात महाश्‍वेता देवी यांच्या मुळ कादंबरीवर आधारित ‘कुरुक्षेत्रानंतर’ हे नाटक सादर होईल. याचे नाट्यरुपांतर व दिग्दर्शन शंभू पाटील यांचे तर संकल्पना मंजुषा भिडे यांची आहे.महोत्सवाचा समारोप बुधवारी दि.१६ डिसेंबर रोजी दि.बा.मोकाशी यांच्या ‘पालखी’ या कांदबरीच्या सादरीकरणाने होणार आहे. भावांजली महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. पाच दिवसीय महोत्सवात सोमवार वगळता सर्व कार्यक्रम भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटरमध्ये सादर होतील. सर्व कार्यक्रम सायंकाळी ६.३० वा सुरु होणार आहेत. कोरोनाच्या या काळात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देऊन फिजिकल डिस्टंसिंग पाळून महोत्सव होणार आहे.प्रवेशिका असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही . महोत्सवासाठी जळगावकर रसिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महोत्सवाचे प्रमुख अनिस शहा, अनिल कांकरिया अमर कुकरेजा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here