पाचोरा ः प्रतिनिधी
शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुशिल मराठे यांच्या मालकीच्या भाग्यलक्ष्मी रेस्टॉरंटला आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शॉर्टसक्रीटमुळे आग लागल्याची घटना घडली. या आगीत हॉटेलच्या प्रवेशद्वारा जवळच असलेले किचन जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नगरपालिकेचे सफाई मुकादम बापु ब्राम्हणे व त्यांचे सहकार्यांना आग लागल्याची घटना लक्षात येताच त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न करत तात्काळ न.पा.अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे राजु कंडारे,आबा पाटील, भिकन गायकवाड, युसुफ खान यांनी आग विझविण्यात यश आले. सदरची घटना पहाटे घडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली व किचनमध्ये असलेले गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढल्याने पुढील होणारा अनर्थ टळला. घटनास्थळी नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी भेट देऊन घटनेविषयी माहिती जाणून घेतली.