जळगाव ः प्रतिनिधी
कोरोना संकटामुळे १० महिन्यांपासून बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शाळा शहरासह जिल्ह्यात आजपासून सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने शाळांकडून सफाई व निर्जंतुकीकरणाचे कामाची पूर्ण सज्जता केल्याचे दिसून आले.
कोरोनाचा कहर सुरू होताच २० मार्चपासून जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील नववी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असला तरी आता विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. कोरोनाचा परिणाम कमी होत असल्याने शालेय शिक्षण विभागाने स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन २७ जानेवारीपासून ५वी ते ८वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली होती. त्यादृष्टीने शाळांमध्ये स्वच्छता, सॅनिटायझर करून घेण्यात आल्या. हे वर्ग सुरु होण्यापुर्वी संबंधित शिक्षकांची कोरोना तपासणीही करण्यात आली.मात्र बर्याच पालकांच्या मनामध्ये मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? याबाबत अजूनही संभ्रम असल्याचे दिसत आहे.